इस्लामपूर : येथील पेठ रस्त्यावरील डॉ. सचिन सांगरूळकर यांच्या लक्ष्मी-नारायण कोविड उपचार केंद्रात बेकायदा जमाव जमवून डॉक्टर पती, पत्नी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी संघर्ष समितीचे नेते शाकीर तांबोळी यांना सांगली येथून ताब्यात घेतले. मात्र रीतसर अटक करण्यापूर्वी केलेल्या वैद्यकीय तपासणीत तांबोळी हे कोरोनाबाधित असल्याचे आढळल्याने त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
लक्ष्मी-नारायण रुग्णालयात कोरोनाबाबतचे उपचार सुरू असताना कापूसखेड येथील धोंडीराम वसंत पाटील यांचे निधन झाले होते. उपचारातील हेळसांड आणि डॉक्टरांचा हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करीत पाटील कुटुंबीयासोबत शाकीर तांबोळी यांच्यासह पन्नास ते साठ जणांनी रुग्णालयात जाऊन साहित्याची आदळआपट केली होती. त्यामुळे डॉ. सचिन सांगरूळकर यांनी तांबोळी यांच्यासह ५० ते ६० जणांविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यावरून या सर्वांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचा भंग करण्यासह इतर कलमांखाली गुुन्हा नोंद करण्यात आला होता.
दरम्यान, शाकीर तांबोळी यांनी आपली अटक टाळण्यासाठी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी शोधमोहीम राबविल्यानंतर तांबोळी यांना सांगली येथून ताब्यात घेण्यात आले. मात्र त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
कोट
लक्ष्मी-नारायण रुग्णालयातील घटनेत दाखल असलेल्या गुन्ह्याअंतर्गत शाकीर तांबोळी यांना ताब्यात घेण्यात आले होते. अटकेची रीतसर कारवाई करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांचे घटनादत्त अधिकार शाबूत ठेवून कोविड संदर्भातील मार्गदर्शन सूचनांची माहिती देत त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर पोलिसांची निगराणी राहणार आहे.
- नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक