सांगली : गेल्या अनेक वर्षांपासून चिखल, सांडपाण्याच्या सहवासात राहणाऱ्या सांगलीच्या शामरावनगरमधील नागरिकांनी शनिवारी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. महापालिका दखल घेत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी काही तरी करावे, अशी मागणी करताना नगरसेवक राजू गवळी यांना रडू कोसळले, तर शामरावनगरमधील कार्यकर्ते संदीप दळवी यांनी जिल्हाधिकाºयांचे पाय पकडून प्रश्न सोडविण्याची विनंती केली.
गेली दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शामरावनगर येथे नागरिकांची दैना उडाली आहे. ड्रेनेजच्या ठेकेदाराने रस्त्यावर खुदाई केल्याने नागरिकांना आता रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. महापालिका प्रशासनाकडे या भागातील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार मुरमीकरणाची मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नगरसेवक गवळी, संदीप दळवी, अमर पडळकर, ज्योती आदाटे, शहाजी भोसले, अर्जुन कांबळे, शैलेश पवार आदींनी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने वारंवार आश्वासने देऊन कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. येथील नागरिक गुडघाभर चिखलातून ये-जा करीत असून, शेकडो घरांना सांडपाण्याने वेढले आहे. ड्रेनेजमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. नागरिकांना व लहान मुलांना बाहेर पडता येत नाही. चिखलामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आठ ते दहा हजार लोकांचे सध्या हाल सुरू आहेत.
महापालिका लक्ष देत नाही, साहेब तुम्ही तर जरा लक्ष घाला, अशी मागणी करताना नगरसेवक गवळी भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यातून पाण्याची धार लागली. संदीप दळवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पाय धरले. साहेब, आता आम्हाला सहन होत नाही. राहणे आणि जगणे कठीण झाले असल्याची व्यथा सर्वांनी मांडली. जिल्हाधिकाºयांनी याप्रश्नी गंभीर दखल घेतली. त्यांनी तात्काळ आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याशी चर्चा करुन तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. सोमवारी आपण स्वत: या परिसराची पाहणी करून आवश्यक त्या सोयी-सुविधा दिल्या जातील, अशी ग्वाही दिली.यानंतर शिष्टमंडळाने आमदार सुधीर गाडगीळ यांना निवेदन दिले. त्यानंतर आयुक्तांना भेटून याठिकाणच्या प्रश्नांबाबत गाऱ्हाणे मांडले.निकृष्ट कामाबद्दल तक्रारमहापालिकेने ड्रेनेजच्या चरी मुजविण्यासाठी सव्वा कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. चरी मुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार शामरावनगरमधील शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली. या परिसरात उपायुक्त पाहणी करतील व नागरिकांना आवश्यक त्या सुविधा दिल्या जातील, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.
...तर आयुक्तांची हत्तीवरून मिरवणूक काढू!महापालिकेने रस्ते डांबरीकरण करण्यापेक्षा रस्त्यांवर ये-जा करण्यासाठी मुरूम टाकावा व दोन्ही बाजूला चरी माराव्यात. असे केले तर आम्ही तुमची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे शिष्टमंडळाने आयुक्तांना साांंगितले. मात्र आयुक्तांनी मुरूम टाकण्यास असमर्थता दर्शविली. मुरुम टाकला तर पैसा वाया जाणार, असे उत्तर दिले. यावर नगरसेवक गवळी यांनी तात्काळ मुरुम टाका अन्यथा डांबरीकरणाची कामे बंद पाडू, असा इशारा दिला.