सांगली : प्रगत युरोपियन देशांकडून भारतीय उद्योजकांना नवनवे तंत्रज्ञान देण्यास नकारघंटा मिळणे हा सातत्याचा अनुभव आहे. अशा नकारांना तोंड देतच भारतीय उद्योजकांनी अनेकविध तांत्रिक आविष्कार घडविले आहेत. मिरज औद्योगिक वसाहतीतील शरद काळे या उद्योजकाने त्रिमितीय विव्हिंगचे पेटंट मिळविले आहे. देशभरातील असे हे पहिलेच पेटंट आहे.हवाई प्रवासांतर्गत विमाने, उपग्रह, रॉकेट, हेलिकॉप्टर आदींमध्ये या तंत्राचा वापर होतो. संरक्षण मंत्रालय, मुंबई आयआयटीचा एरोनॉटीक्स विभाग, अहमदाबाद आयआयटी, बंगळुरूची नॅशनल एरोनॉटीक्स लॅबोरेटरी विभाग यांच्यासाठी काळे यांनी हे नवसंशोधित तंत्रज्ञान यापूर्वीच पाठवायला सुरुवात केली आहे. या प्रकल्पावर २०१३ पासून त्यांचे काम सुरू होते. गुरुवारी (दि. ३०) पेटंट कार्यालयाने त्यावर मान्यतेची मुद्रा उमटविली. या तंत्राचे स्वामित्व २० वर्षांसाठी काळे यांच्याकडे राहील.असे आहे तंत्रज्ञान...प्रचंड हवाई दाबाला तोंड देणाऱ्या वाहनांना (विमाने, हेलिकॉप्टर, रॉकेट, उपग्रह, मोटारगाड्या आदी) फायबर बॉडी बसविली जाते. कार्बन फॅब्रिक्स असे त्याचे स्वरूप असते. वरून प्लास्टिकसारखे असले, तरी प्रत्यक्षात मात्र फायबर असते. लोखंडापेक्षा सहापटीने मजबूत व हलके असल्याने हवाई क्षेत्रात प्रामुख्याने वापर होतो. या फायबरचे तब्बल ४० थर एकावर एक बसवून विमानाची बॉडी तयार केली जाते. युरोपीय देशांकडून त्याचे तंत्रज्ञान भारताला मिळत नव्हते. आयआयटी शिक्षणानंतर विविध कंपन्यांत काम केलेल्या काळे यांनी मिरजेतील स्वत:च्या कारखान्यात त्रिमितीय फायबरचे तंत्रज्ञान विकसित केले. पेटंटसाठी २०१३ मध्ये अर्ज दाखल केला. त्याला मान्यता मिळाली. आता देशभरात त्याचा वापर सुरू झाला आहे. भारतातील हे पहिले आणि एकमेव तंत्रज्ञान ठरले आहे.
जुन्या पद्धतीच्या फायबरला मागे टाकणारे हे तंत्र आहे. हवाई वाहतूक क्षेत्रासाठी हा बदल क्रांतिकारी ठरेल. सध्या संशोधन व विकास विभागाला पुरवठा सुरू आहे. परदेशी मदत न घेता देशातच ते विकसित करता आले, याचा अभिमान आहे. - शरद काळे, उद्योजक