सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत यावे, असे आवाहन मी २०१९ मध्येच केले होते. ते न मानल्याने त्यांचा पक्ष फुटला. अजूनही ते आल्यास स्वागत आहे, काँग्रेसला मात्र आमचा विरोध राहील, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. सांगलीत पत्रकार बैठकीत ते बोलत होते.आठवले म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंला संधी मिळावी, तसेच महामंडळांची घोषणा तातडीने करून आम्हाला दोन महामंडळे द्यावीत, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिर्डीसह दोन जागा मिळाव्यात, अशीही मागणी आहे. रिपाइंला मान्यताप्राप्त पक्ष बनवण्यासाठी या जागा आवश्यक आहेत. राज्यभरात रिपाइं कार्यकर्त्यांच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक प्रशिक्षणासाठी शिबिरे घेणार आहोत.शरद पवार यांनी या वयात फिरणे योग्य नाही. अजित पवारांमुळे सरकारची ताकद वाढली असली, तरी त्यांच्या चौकशा सुरूच राहतील. देशात समान नागरी कायदा नसल्याने हिंदू-मुस्लिम संघर्ष सुरू आहे. त्यामुळे हा कायदा गरजेचा आहे. मुस्लिमांनी त्याविषयी सूचना अवश्य द्याव्यात. हा कायदा नसल्याने मुस्लिमांची संख्या वाढली, यामध्येही तथ्य नाही. हा कायदा आवश्यक असल्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीही भूमिका होती.यावेळी विवेक कांबळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, सुरेश बारशिंगे, गौतम सोनवणे, सचिन सवाखंडे आदी उपस्थित होते.आठवले म्हणाले...
- म्हैसाळ योजनेच्या जत विस्तारित योजनेला निधीसाठी प्रयत्न.
- विधानसभेला २०० पेक्षा जास्त आणि लोकसभेला ४० पेक्षा जास्त जागा मिळतील.
- भाजप, शिवसेना व अजित पवार मिळून २०२४ ची निवडणूक ताकदीने लढवू
- अमेरिकेत कोलंबियामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी पंतप्रधानांना भेटणार
- आगामी निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढवणार नाही