अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : पृथ्वीराज चव्हाण राज्यातील आमचे क्रमांक एकचे नेते आहेत. त्यामुळे शरद पवारांनी आमच्या पक्षातील नेत्यांविषयी विचार करण्यापेक्षा त्यांच्या पक्षात काय चाललंय ते पहावे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत लगावला.
ते म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. कोणतेही मतभेद नाहीत. तरीही एकमेकांच्या पक्षात डोकावणे चुकीचे आहे. पृथ्वीराज चव्हाण आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याविषयी बोलण्यापेक्षा शरद पवारांनी राष्ट्रवादीमध्ये काय सुरू आहे, ते पहावे. त्याकडे अधिक लक्ष द्यावे. राष्ट्रवादीची अनेक गोष्टीतील भूमिका आमच्यापेक्षा वेगळी असली तरी आघाडीत काही फरक पडणार नाही. भाजपच्या विरोधातील पक्षांनी एकत्र राहिले पाहिजे. आम्ही त्यासाठी आग्रही आहोत. त्यामुळे कोणता पक्ष काय भूमिका घेतोय, याकडे आम्ही फारसे लक्ष देणार नाही. त्यांच्या भूमिका काहीही असल्या तरी निवडणुकीत भाजपच्या विरोधाची आमची भूमिका एक आहे.
भविष्यातील निवडणुकांविषयी ते म्हणाले की, जागावाटप किंवा अन्य राजकीय धोरणांबाबत आताच चर्चा करण्यापेक्षा आम्ही लोकांच्या प्रश्नावर लढणार आहोत. शेतकरी, सामान्य नागरिक, कामगार व अन्य विविध घटकांचे प्रश्न आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
मॅचफिक्सिंग सहन करणार नाही
भाजपने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना खूप त्रास दिला. देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये भाजपबद्दल संताप आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही स्तरावर भाजपशी युतीचा विचारही आम्ही करणार नाही. तरीही कुठे काँग्रेसच्या कुणी नेत्याने मॅचफिक्सिंग केली, तर खपवून घेणार नाही, असा इशारा पटोले यांनी दिला.
एकमेकांचे पक्ष फोडणे बरोबर नाही
उद्धव ठाकरेेंच्या हस्ते कोकणात काँग्रेसच्या काही लोकांचा प्रवेश झाला. या गोष्टी चांगल्या नाहीत. एकमेकांचे लोक फोडायचे नाहीत, असे महाविकास आघाडीचे धोरण ठरले आहे. त्यामुळे जेव्हा सर्व नेत्यांची बैठक होईल, तेव्हा आम्ही या गोष्टी मांडणार आहोत, असे पटोले म्हणाले.
इस्लामपूरच्या मेळाव्यामागे अन्य कारण नाही
ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस असलेले नंदकुमार कुंभार इस्लामपूरचे असल्याने त्यांनी मेळावा आयोजित केला होता. कोणालाही शह देण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी तेथे मेळावा घेतला नाही, असे पटोले यांनी स्पष्ट केले.