सांगली : राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केलेले वक्तव्य योग्य नसून ते पाप आहे. महाभारतात आपल्याच नातेवाईकांविरुद्ध लढताना अर्जून जसा गोंधळला होता तशी या दोन्ही नेत्यांची अवस्था झाली आहे, अशी टीका शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, उद्धव ठाकरे व शरद पवार दोन्ही नेते वंदनीय आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या वतीने राम मंदिराच्या भूमिपूजनास उपस्थित रहावे. उद्धव ठाकरे यांनी आॅनलाईन पद्धतीने सोहळा करण्याची केलेली मागणी बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात आवडली नसती.
शिवसेना ही हिंदू धर्मरक्षणासाठी आवश्यक आहे. शिवसेनेचे यातील योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जायला हवे. राज्यभरातही दौरा करून ठाकरे यांनी कोरोनाबद्दलची लोकांमधील भीती दूर करावी.कोरोनाला घाबरून जाण्याचे कारण नाही. सूरक्षित अंतराचा नियम तसेच लॉकडाऊनसारखे प्रकार खच्चीकरण करणारे आहेत. त्यामुळे राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा दिवाळीसारखा एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करावा.
देशातील सर्व हिंदू बांधवांनी दारासमोर सडा टाकून रांगोळी काढावी आणि फटाक्यांची आतषबाजी करावी. जवळपास ५00 वर्षानंतर याठिकाणी मंदिर उभे रहात असल्याने हा हिंदू धर्मियांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. जाती-पाती व राजकीय भेदभाव टाळून सर्वांनी या क्षणाला एकत्र यावे.राम मंदिराचे पुजारी गोविंदगिरी महाराज यांच्याशी मी संपर्क साधला होता. भूमिपूजनावेळी ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदू धर्माच्या रक्षणाचे अत्यंत मोलाचे कार्य केले त्यांची प्रतिमाही पुजावी, अशी मागणी केली आहे. हिंदू धर्मियांनीही रामाबरोबर छत्रपती शिवरायांची पूजा त्यादिवशी घरांमध्ये करावी. राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी शिवरायांच्या ३२ किल्ल्यांवरील माती व सरोवराचे पाणी आम्ही पाठवत आहोत.पुतळ्यास मिशा असाव्यातराम-लक्ष्मण हे पुरुष होते. आजपर्यंत त्यांच्या कोणत्याही प्रतिमांमध्ये त्यांना मिशा दाखविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे राम मंदिरातील मूर्ती तयार करताना त्यांना मिशा असाव्यात, अशी मागणी आम्ही गोविंदगिरी महाराजांकडे केल्याचे भिडे यांनी सांगितले.संसदेत आक्षेप घेणाऱ्यांनी राजीनामा द्यावासंसदेत उदयनराजे यांनी ‘जय शिवाजी, जय भवानी’ असे म्हटल्यानंतर ज्यांनी त्यावर आक्षेप घेतला त्यांनी तातडीने राजीनामा देऊन त्यांच्या गावाकडे परतावे, अशी मागणी भिडे यांनी यावेळी केली.