कुपवाड : शहरातील सराईत गुन्हेगार सनी ऊर्फ शुभम जैन याच्या खूनप्रकरणी कुपवाड पोलिसांकडून त्याचा सख्खा भाऊ शशांक पारसमल जैन (वय २४, रा. खारे मळा, कुपवाड) यास अटक करण्यात आली. पोलिसांनी शशांक याला रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली.
सनी जैन हा काही दिवसांपूर्वी घरफोडी प्रकरणातून जामिनावर बाहेर आला होता. त्याने कारागृहातून बाहेर आल्यापासून दररोज आई व भावाला दारूच्या नशेत मारहाण, छळ, मानसिक त्रास देण्याचा उद्योग सुरू केला होता. या त्रासाला आई व भाऊ कंटाळले होते. त्यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला होता.
शनिवारी (दि.२३) रात्री तो पुन्हा दारू पिऊन घरात दंगामस्ती करू लागला. या वादावादीत सन्या घरातील धारदार तलवार घेऊन भाऊ शशांक याच्या अंगावर धावून गेला.
शशांक हा जीव वाचविण्यासाठी घरातून बाहेर पळत सुटला. सनी हातात तलवार घेऊन
त्याच्या मागे धावत सुटला. राणाप्रताप चौकातील रस्त्यावरील दगडाची ठेच लागल्याने सनी रस्त्यावर पडला. दारूच्या नशेत असल्याने त्याला उठता आले नाही.
सनी रस्त्यावर पडल्याचे दिसताच संशयित शशांक याने रस्त्यावरील दगड उचलून सनीच्या डोक्यात घातला. वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर शशांक याने रस्त्यावर पडलेली तलवार हातात घेऊन सनीच्या मानेवर वार केले. रस्त्यावर नागरिक जमा होताच शशांक रस्त्यावर तलवार टाकून पसार झाला. हल्ल्यातील तलवार पोलिसांनी जप्त केली आहे.