लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरूड :-शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील खासगी आराम बसचालकांकडून होणारी आर्थिक पिळवणूक आणि मुंबईसह अन्य शहरात असणाऱ्या लोकांची होणारी अडचण लक्षात घेऊन कऱ्हाड आगाराने शेडगेवाडी ते मुंबई व कोकरूड ते पिंपरी-चिंचवड एस.टी.सुरू केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने पंधरा दिवसांपूर्वी बातमी प्रसिद्ध केली होती.
वर्षभरापासून सुरू असलेला कोरोना काळ आणि त्यातच पुणे, मुंबईकडे प्रवास करणाऱ्या लोकांची खासगी आराम बसचालकांकडून आर्थिक लूट सुरू आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय पाहून सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड आगाराने शेडगेवाडी ते मुंबई, कोकरूड ते पिंपरी चिंचवड एस.टी. ची सुरुवात केली आहे.
‘लोकमत’ मधील बातमीची दखल घेत महाडिक युवाशक्तीचे अनिल घोडे- पाटील यांनी कोकरूड येथे खासगी आराम बस अडवून मुंबई तिकीट दरवाढीचा जाब विचारला होता. विनाकारण जास्त पैशांची आकारणी केली तर ट्रॅव्हल्स फोडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
कराड वरिष्ठ आगार व्यवस्थापक विजयराव मोरे म्हणाले की, दर रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता शेडगेवाडी ते मुंबई एस. टी. सुरू करण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांसाठी २७५ रुपये व रेग्युलर ५४५ रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे तर कोकरूड ते पिंपरी चिंचवड एस.टी. दररोज सकाळी साडेसात वाजता कोकरूड येथून सुटणार आहे. कोकरूड ते स्वारगेट दर २०० रुपये असणार आहे.
या एसटीच्या पहिल्या फेरीला नारळ फोडून सुरुवात करण्यात आली. यावेळी कराड आगाराचे वाहतूक नियंत्रक राहुल शेवाळे, लिपिक अमित कोळी, लिपीक दीपक महाजन व ग्रामस्थ उपस्थित होते.