करगणी : शेटफळे (ता.आटपाडी) गाव दोन दिवसांपासून अंधारात असून, संतप्त ग्रामस्थांनी दिघंची-हेरवाड महामार्ग अडवत वाहतूक बंद केली. महावितरण व महामार्ग बनविणारी कंपनी यांच्या वादामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
शेटफळेतून दिघंची-हेरवाड महामार्ग जात आहे. या महामार्गाचे काम राजपथ इन्फ्रा कंपनी करत असून, शेटफळे गावातून सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनत आहे. मात्र, या महामार्गातच अनेक विजेचे खांब आहेत. ते तसेच ठेऊन सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनविला गेला आहे. दरम्यान, शनिवारी एक मालवाहतूक ट्रक विजेच्या खांबावर आदळल्याने दोन दिवसांपासून निम्मे गाव अंधारात आहे. महामार्ग बनवत असताना, विजेचे खांब महामार्गाच्या बाजूला घेणे गरजेचे असताना, राजपथ कंपनीने महामार्गातच विजेचे खांब कायम ठेवून काम केले आहे. महावितरण कंपनीने विजेचे खांब सुरक्षित ठिकाणी हलवूनच महामार्गाचे काम करण्याच्या सूचना देणे गरजेचे होते. मात्र, महावितरणकडूनही याबाबत दुर्लक्ष करण्यात आले. याचा फटका ग्रामस्थांना बसत असून, दोन दिवसांपासून गाव अंधारात असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.