सांगली : गेल्या दोन महिन्यांपासून कॉँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांच्या प्रभाग ११, १५ मध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेच्या प्रशासनाकडून जाणीवपूर्वक पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप करीत, बुधवारी दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांसह नागरिकांनी महापालिकेवर घागरमोर्चा काढला. महापालिकेच्या दारात मडकी फोडून जोरदार घोषणाबाजी करीत नागरिकांनी प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या निषेधार्थ शिमगा केला.
प्रभाग १५ मधील युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण, नगरसेवक फिरोज पठाण, पवित्रा केरीपाळे, आरती वळवडे, प्रभाग ११ च्या नगरसेविका शुभांगी साळुंखे, अमर निंबाळकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी नागरिकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत महापालिकेच्या दारातच ठिय्या मारला. मंगेश चव्हाण म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून प्रभाग १५ मधील पत्रकारनगर, गणेशनगर, गारपीर चौक, विद्यानगर, सीतारामनगरसह सर्वच परिसरात पाण्याचा ठणठणाट सुरू आहे.
भाजप सत्तेवर आल्यापासून सत्ताधारी आणि प्रशासनाने पाण्याचा खेळखंडोबा सुरू केला आहे. गणेशोत्सवातही पाण्याची टंचाई होती. आता दसरा, दिवाळीच्या तोंडावरही हेच चित्र आहे. शुभांगी साळुंखे यांनीही प्रभाग ११ मधील पाणीटंचाईचा पाढा वाचला.
प्रशासनाच्यावतीने सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी आंदोलक व नगरसेवकांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक महिलांनी त्यांना धारेवर धरले. आयुक्तांशीच चर्चा करण्याचा आग्रहही आंदोलकांनी धरला. अखेर आयुक्त खेबूडकर महापालिकेत आले. त्यांनाही घेराव घालण्याचा प्रयत्न झाला. खेबूडकर यांनी नगरसेवकांसह शिष्टमंडळाला कार्यालयात नेऊन अधिकाºयांसमवेत बैठक घेतली. यावेळी चव्हाण, पठाण, वळवडे आदींनी पाणी समस्यांबाबत अधिकाºयांना जाब विचारला.
याबाबत खेबूडकर म्हणाले, शहराला समान पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी तीनही शहरात ४९ वॉल्व्ह शोधून काढले आहेत. ते कार्यान्वित केल्यानंतर पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघेल. यावेळी पाणीपुरवठा अधिकारी मुलाणी यांनी माळबंगला येथील मुख्य वॉल्व्ह बदलण्याचे काम केल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी १० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यावर खेबूडकर यांनी ते काम तात्काळ करण्याचे आदेश दिले.
शिवाय शहरातील गळती काढण्यासाठी टेंडर देऊन कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे खेबूडकर यांनी आश्वासन दिले. प्रभाग १५ साठी माळबंगल्याऐवजी पुन्हा हिराबाग येथील पाणी टाक्यांतूनच पाणीपुरवठा करण्याची सूचना केली. यावेळी विपुल केरीपाळे, रवींद्र वळवडे यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.