सांगली : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार जानेवारीअखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात होण्याचा अंदाज बांधला जात असतानाच सांगली जिल्ह्यातील भाजप व शिंदे गटाच्या आमदार समर्थकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यासह भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर यांची नावे चर्चेत आली आहेत.भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाची सत्ता सध्या राज्यात असून सांगली जिल्ह्यात या दोन्ही पक्षांचे तीन विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व आहे. खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे. सत्ता स्थापनेवेळी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश न झाल्याने त्यांच्या समर्थकांत नाराजी होती. विस्तारात त्यांना संधी मिळेल, अशी आशा आहे.जिल्ह्यात सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे दोन आमदार आहेत. यातील मिरजेचे सुरेश खाडे यांना मंत्रिपद मिळाले आहे. त्यांना मंत्रिपद मिळाले त्यावेळी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचेही नाव चर्चेत होते. गाडगीळांचा समावेश मंत्रिमंडळात झाला नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्येही नाराजी होती. विस्तारात तरी त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा समर्थकांमधून व्यक्त होत आहे. खानापूर-आटपाडी मतदारसंघातील भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांचेही नाव मंत्रिमंडळ विस्तारामुळे चर्चेत आले आहे.जिल्ह्याकडे केवळ एकच मंत्रिपदजिल्ह्याला सध्या एकच मंत्रिपद आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात जिल्ह्याला तीन-चार मंत्रिपदे मिळत हाेती. भाजपच्या काळात जिल्ह्याचे मंत्रिमंडळातील वजन कमी झाले आहे. त्यामुळेच आणखी मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात सांगली जिल्ह्याला संधीची शक्यता, समर्थकांच्या आशा पल्लवीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 6:08 PM