सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत केलेल्या वक्तव्याने त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सांगली जिल्ह्यातही शिवसेनेच्या शिंदे गटाला भाजपकडून दगाफटक्याची भीती वाटते. जिल्ह्यात हक्काची एक जागा लढविताना ही फार मोठा संघर्ष शिंदे गटाला करावा लागणार आहे.जिल्ह्यात शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे खानापूर मतदारसंघावर वर्चस्व आहे. तरीही याच मतदारसंघातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे निवडणूक लढविण्यासाठी आग्रही आहेत. ही जागा भाजपला व पर्यायाने आपल्यालाच मिळणार, असा दावा त्यांनी यापूर्वी केला आहे. मतदारसंघातील दावेदारीवरून बाबर व पडळकर यांच्यात गेली दीड वर्षे संघर्ष सुरू आहे. त्यामुळे बाबर यांच्या समर्थकांना महाविकास आघाडीपेक्षा भाजपच्या स्पर्धेची चिंता अधिक वाटते.बाबर यांच्याशी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचाही संघर्ष सुरू आहे. यशवंत साखर कारखान्यावरून अनेक वर्षे दोन्ही नेते राजकीय शत्रुत्वाचा खेळ खेळत आहेत. खानापूरसह इस्लामपूर, तासगाव - कवठेमहांकाळ या मतदारसंघाची मागणीही शिंदे गटाकडून केली जाण्याची दाट शक्यता आहे. इस्लामपूरमध्ये ही भाजपच्याच नेत्यांचा मोठा अडसर शिंदे गट समोर आहे. तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून शिंदे गटाला विरोध होणार हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे सर्वच बाजूंनी शिंदे गटाची भाजपकडून काेंडी होण्याची चिन्हे आहेत.
विरोधकांपूर्वी मित्रपक्षाशी लढतशिंदे गटाला विरोधी महाविकास आघाडीतील प्रतिस्पर्धी उमेदवार अगोदर मित्रपक्ष भाजपमधील स्पर्धकांशी लढावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक आव्हाने सध्या दिसत आहेत.
जिल्ह्यात जागा मिळणार कशा ?भाजप व शिंदे गटातील जागा वाटपाचे सूत्र अद्याप निश्चित नाही. तरीही बावनकुळे यांनी शिंदे गटास राज्यात ४८ जागाच देणार असल्याचे सांगितल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिंदे गटाला जागा मिळविताना अधिक ताकद लावावी लागेल.
जिल्ह्यात विधानसभेचे पक्षीय बलाबलराष्ट्रवादी ३काँग्रेस २भाजप २शिंदे गट १मागील विधानसभेत काय झाले?मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील खानापूर, इस्लामपूर, तासगाव - कवठेमहांकाळ व पलूस-कडेगाव या चार मतदारसंघातून शिवसेनेने, तर अन्य पाच मतदारसंघातून भाजपने निवडणूक लढविली होती. यावेळी शिंदे गटाला किती जागा मिळणार याकडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.