विकास शहाशिराळा : शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. या संस्थेची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे. तसेच सोई-सुविधा नसल्याने सौदे होत नाहीत. फक्त उत्पन्न म्हणजे भाडे हेच आहे. निवडणूक लागली तर पुन्हा संस्था तोट्यात जाईल. त्यामुळे राजकीय मंडळींनी समन्वयाची भूमिका घेत बिनविरोधसाठी वाटचाल सुरू केली आहे.पूर्वी इस्लामपूर बाजार समितीमध्ये शिराळा तालुक्याचा समावेश होता; मात्र २००९ मध्ये शिराळ्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन झाली. पूर्वी २० लाख रूपये उत्पन्न होते, ते आता या काही वर्षात ३२ ते ३३ लाखांपर्यंत गेले आहे. गाळ्यांचे भाडे वगळता इतर कोणतेही उत्पन्न नाही. याठिकाणी गटर, पाणी, रस्ते आदी सुविधा नाहीत. त्यामुळे येथे भाजीपाला, धान्य, शेतीमाल आदींचे सौदे होत नाहीत. आर्थिक बाजू कुमकुवत असल्याने सोई-सुविधा देणे शक्य होत नाही.पूर्वी जनावरांचे बाजार काही ठिकाणी होत होते, मात्र तेही बंद झाले आहेत. हे उत्पन्नाचे साधन बंद असल्यामुळे बाजार समितीला निवडणुकीचा खर्च पेलणारी नाही. यासाठी सामंजस्याने ही निवडणूक बिनविरोध होणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे नेते याबाबत समनव्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता नेहमी चुरस असते. सर्वच राजकीय गट हे आपल्या परिने दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र बाजार समिती निवडणुकीत सध्या वेगळेच वातावरण दिसुन येत आहे.५८ उमेदवारी अर्ज दाखलसहकारी संस्था सर्वसाधारण गटात २०, सहकारी संस्था महिला राखीव ५, सहकारी संस्था इतर मागासवर्गीय ३, सहकारी संस्था वि.जा.भ.ज. ५, ग्रामपंचायत सर्वसाधारण ७, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती ४, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल ३, अडते व व्यापारी ८, हमाल, तोलाईदार ३ असे ५८ अर्ज शिल्लक झाले आहेत. तर सोसायटी गटात १०७६, ग्रामपंचायत ८०६, व्यापारी ७२४, हमाल २८३ असे एकूण २८८९ मतदार आहेत. अर्ज माघारीनंतर बाजार समिती निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार असल्याचे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शिराळा बाजार समिती बिनविरोधसाठी प्रयत्न, आर्थिक परिस्थिती बेताची; निवडणूक झेपणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 4:39 PM