फाेटाे : ०५०६२०२१ एसएएन ०२: शिराळा औद्याेगिक वसाहतीतील कारखान्यांच्या शेडची पत्रे उडून तारांवर अडकली.
फाेटाे : ०५०६२०२१ एसएएन ०३ : शिराळा येथे पावसामुळे औद्याेगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी झाले हाेते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: येथील औद्योगिक वसाहत आणि भटवाडीमध्ये शनिवारी वादळ वाऱ्यासह पावसाने कोट्यवधीचे नुकसान झाले. औद्योगिक वसाहतीतील पत्रे उडून अंगावर पडल्याने तीन मुली, महिला, तर भटवाडी येथील महिला असे पाच जण जखमी झाले असून, मेघा लक्ष्मण पाटील (वय २३, रा. थावडे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) गंभीर जखमी आहेत.
या परिसरात सगळीकडे पाणीच पाणी तसेच दूरवर पत्रे उडतानाचे दृश्य भयावह होते. भटवाडी येथील शेतातील बांध फुटून शेतांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शिराळा परिसरात दुपारी चारच्या दरम्यान तालुक्यात वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. येथील औद्योगिक वसाहतीमधील इको राईज बायोफर्टिलायझर कंपनीची भिंत पडली व पत्रे उडून गेली. पत्रे अंगावर पडून मेघा पाटील गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच नूतन महादेव डांगे (२३, रा. शिराळा), सविता बाजीराव निकम (४०), स्नेहल आनंदराव मस्के (वय २३) यांनाही डोक्यास मार लागला, तर नूतन महादेव डांगे (२३, रा. शिराळा) यांचे दोन्ही हात मोडले आहेत. घनश्याम आवटे यांच्या ऐज टीव्ही कंपनीच्या इमारतीची पत्रे उडून गेली आणि भिंत कोसळली. मुंबई येथील रजनी पोपट यांच्या कंपनीची इमारत जमीनदोस्त झाली व सर्व पत्रे उडून गेली. घनश्याम माने यांचे शेड पूर्ण उडून गेले. दिलीप पाटील तसेच आणखी एकाच्या राईस मिलची पत्रे उडून गेली आहेत.
वाऱ्यामुळे हवेत उडत असणारे पत्रे पाहताना धडकी भरत होती. पत्रे उडून दोन किलोमीटरवरील शेतात जाऊन पडली तर काही तारांवर अडकली होती. पावसामुळे सर्वत्र रस्त्यावर, कंपन्यांच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
औद्योगिक वसाहतीशेजारी असणाऱ्या भटवाडी गावातील नरसिंह टेक वस्तीमधील १० ते १५ घरांच्या भिंती पडल्या, तर काही घरांचे छत उडून गेले. घराचे छत डोक्यावर पडल्याने अर्चना प्रकाश चव्हाण जखमी झाल्या आहेत. येथील शेतांमध्ये बांध फुटून शेतीचे नुकसान झाले आहे.
चौकट
भटवाडीत छत उडून घरे उघड्यावर
भटवाडी येथील प्रकाश विश्वास चव्हाण, विकास विश्वास चव्हाण, दीपक विश्वास चव्हाण, सुभाष बाळू चव्हाण, हंबीर बाळू चव्हाण, शीला शंकर चव्हाण, युवराज श्यामराव चव्हाण, राजाराम लक्ष्मण चव्हाण, आकाराम लक्ष्मण चव्हाण, बाबासाहेब शंकर फडतरे यांच्या घरांची पत्रे वादळ वाऱ्यामुळे उडून गेली आहेत.