शिराळा : येथील एमआयडीसीमधील कंपनीतील कर्मचाऱ्याने त्याच्या लग्नासाठी ३० हजार रुपये ॲडव्हान्स मागितला; मात्र त्याला कर्मचारीवर्ग व कंपनीने लग्नाअगोदरच ६५ हजार रुपयांचा आहेर दिला.
कंपनीचे मालक घनशाम आवटे यांनी शामराव शिंदे आणि वैभव स्वामी यांना आहेराबाबत कर्मचाऱ्यांना आवाहन करण्याची सूचना केली होती. त्यास कर्मचाऱ्यांनी साथ देत दोन दिवसांत ३२ हजार ८०० रुपये जमा केले. आवटे हेही आहेर करणार होतेच. मग कंपनीच्या व्यवस्थापनातील मंडळी कर्मचाऱ्यांकडून जमा झालेली रक्कम घेऊन त्यांच्याकडे गेली. तुम्ही किती आहेर देणार, हे विचारताच आवटे यांनी ‘तुम्ही सर्वांनी मिळून जेवढी रक्कम जमा केली, तेवढीच रक्कम कंपनीकडून देण्यात येईल,’ असे जाहीर केले. जमा झालेल्या ६५ हजार ६०० रुपये रकमेचा धनादेश लग्नापूर्वीचा आहेर म्हणून कंपनीने अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक गायकवाड आणि शिराळ्याच्या नगराध्यक्षा सुनीता निकम यांच्याहस्ते व उद्योजक राजेंद्र निकम, श्वेता आवटे, इंद्रनील आवटे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित कर्मचाऱ्याला दिला.
फोटो-०८शिराळा१
फोटो ओळ - शिराळा एमआयडीसीमधील कंपनीतील कर्मचाऱ्याला लग्नापूर्वीच आहेराचा धनादेश विनायक गायकवाड, नगराध्यक्षा सुनीता निकम, घनशाम आवटे यांच्या हस्ते देण्यात आला.