विकास शहा ल्ल शिराळा ‘जिवंत नागाची पूजा’ करण्यास जोपर्यंत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत सर्व निवडणुकांवर शिराळकरांनी ‘बहिष्कार’ टाकल्याने, शिराळा नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक बहिष्कारात अडकली आहे. या बहिष्कारामुळे सर्व इच्छुकांनी निवडणुकीपेक्षा नागपंचमीसाठी ग्रामस्थांच्या पाठीशी राहण्याचे ठरविले आहे. प्रशासकीय यंत्रणेने मात्र निवडणुकीची तयारी चालू केली आहे. १२ डिसेंबर १९४० रोजी शिराळा ग्रामपंचायतीची स्थापना झाली. ही ग्रामपंचायत अमृतमहोत्सव साजरा करीत असतानाच, १६ मार्च २०१६ रोजी ही ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपंचायतीची स्थापना झाली. या ग्रामपंचायतीवर स्थापनेपासूनच नाईक गटाची सत्ता होती. ती अगदी शेवटपर्यंत होती. ग्रामपंचायत बरखास्त झाली, त्यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक व माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांची निर्विवाद सत्ता होती. १७ सदस्यांपैकी राष्ट्रवादीचे ११, कॉँग्रेसचे ५, तर आमदार शिवाजीराव नाईक गटाचा एकच सदस्य होता. या शहरात १९९५ ला शिवाजीराव नाईक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर, शिराळा बायपास, पोलिस ठाणे इमारत, न्यायालय इमारत, सभागृह आदी विकासकामे केली. दोन नाईक गट एकत्र असताना शिराळा पाणीपुरवठा योजना करण्यात आली. मानसिंगराव नाईक यांनी आमदारकीच्या काळात शिराळा शहराचा ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्रात समावेश केल्याने या शहराला मोठा निधी मिळू लागला. यातून त्यांनी शहरातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण, गटारी, तसेच ७.५० कोटीची नवीन पाणीपुरवठा योजना केली. मानसिंगराव नाईक, देशमुख गटाच्या कारकीर्दीत पंचायत समिती इमारत, प्रशासकीय इमारत, एसटी बसस्थानक, अंबामाता मंदिराचा कायापालट आदी कामे झाली. कॉँग्रेसचे सत्यजित देशमुख यांची साथ राष्ट्रवादीला असल्याने, या ठिकाणी कॉँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीविरूध्द भाजप असे समीकरण आहे. भाजपमार्फत जि. प. सदस्य सम्राट महाडिक गट, शिवसेना व कॉँग्रेस आघाडीतील नाराज व्यक्तींना एकत्र करून काँग्रेस आघाडीविरूध्द लढण्याचे गणित मांडले होते. जनतेतून नगराध्यक्ष निवडीमुळे सर्व गटांकडे, उमेदवार कोण याची चर्चा होती. ना. मा. प्रवर्ग महिला उमेदवारासाठी हे पद आरक्षित झाले आहे. त्यामुळे यासाठी सर्वसमावेशक महिला कोण, याची चाचपणी सुरू होती. १७ प्रभाग या शहरात आहेत. यामध्ये ५ सर्वसाधारण, ५ सर्वसाधारण स्त्री, ना. मा. प्रवर्ग २, ना. मा. प्रवर्ग स्त्री ३, अनुसूचित जाती १, अनुसूचित जमाती १ असे आरक्षण आहे. सध्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, आरक्षण पडले आहे. मात्र ही पहिली निवडणूक बहिष्कारात अडकली आहे. जगाच्या नकाशावर ज्यामुळे या गावाचे अस्तित्व आहे, ती ‘जिवंत नागपूजा’ करणारे बत्तीस शिराळा’ ही अस्मिता आणि नाव टिकविण्यासाठी २००२ पासून गावाने न्यायालयीन लढा लढला. पण जिवंत नागपूजेसच न्यायालयाने बंदी घातल्याने, आता ध्येय फक्त ‘जिवंत नागपूजेला परवानगी’ मिळविण्याचेच ठेवले आहे. ही परवानगी मिळत नाही, तोपर्यंत सार्वत्रिक निवडणुकीत शिराळकर सहभागी होणार नाहीत. फक्त ‘बहिष्कारच’! या बहिष्कारास राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे आदी सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही पहिलीच निवडणूक होण्याची चिन्हे धूसर आहेत. शासकीय यंत्रणेची मात्र निवडणूक होण्याच्यादृष्टीने तयारी चालू झाली आहे. शिराळा शहरातील विविध फलक प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. प्रशासनाच्या समन्वय बैठकांकडेही शिराळकरांनी पाठ फिरवली आहे.
शिराळ्याची निवडणूक अडकली बहिष्कारात
By admin | Published: October 25, 2016 1:03 AM