शिराळा : नगरपंचायतीचा दोन कोटी ८८ लाख ५१ हजार २१८ रुपयांचा २०२१- २०२२ या वर्षासाठीचा शिलकी अर्थसंकल्प सोमवारी विशेष सभेत मंजूर करण्यात आला. ही सभा नगराध्यक्षा सुनीता निकम यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
येथील व्यापारी सभागृहात ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. उपनगराध्यक्ष विजय दळवी, मुख्याधिकारी योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीस लेखापाल नयना कुंभार यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करून माहिती दिली.
यावेळी अर्थसंकल्पामध्ये महसूल जमा तीन कोटी ३७ लाख ४८ हजार रुपये, महसूल खर्च दोन कोटी ८२ लाख ६९ हजार असून, भांडवली जमा १९ कोटी ७८ लाख १० हजार, भांडवली खर्च १७ कोटी ४४ लाख ३७ हजार ७८२ रुपये असून, एकूण जमा २३ कोटी १५ लाख ५८ हजार रुपये आहे. खर्च २० कोटी २७ लाख ६ हजार ७८२ असून, दोन कोटी ८८ लाख ५१ हजार २१८ रुपये शिल्लक आहे.
महसूल जमामध्ये प्रामुख्याने एकूण मालमत्ता वरील कर, जाहिरात कर, कार्यक्रम व प्रयोग प्रदर्शन कर, ऐच्छिक नगर परिषद कर आदींचा समावेश असून, कर्मचारीवर्ग पगार, कार्यालयीन खर्च आदींचा समावेश आहे. १४ व १५व्या वित्त आयोगाचे तीन कोटी ८० लाख रुपये, १४ कोटी २५ लाख १० हजार रुपये अनुदान आदींचा भांडवली जमा होणार आहेत.
यावेळी प्रतिभा पवार, सुनंदा सोनटक्के, इंगवले, राजश्री यादव, नेहा सूर्यवंशी, उत्तम डांगे, मोहन जिरंगे, आशाताई कांबळे, सुजाता इंगवले, संजय हिरवडेकर, वैभव गायकवाड, विश्वप्रताप नाईक, लेखापाल नयना कुंभार, कार्यालयीन अधीक्षक सुविधा पाटील, प्रीती शिंदे , सुभाष इंगवले, संजय इंगवले आदी उपस्थित होते.
चाैकट
समान निधी द्या
सभेत प्राध्यापक कॉलनीमधील गल्ल्यांना नावे व क्रमांक देणे, विविध विकासकामाकरिता निविदा मागवणे याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी विकासकामे करताना सर्व प्रभागांना समान न्याय द्यावा, असे निवेदन सर्वच नगरसेवकांनी केले.