लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा नगरपंचायतीला जागा अपुरी पडू लागल्याने येथे नगराध्यक्षा, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक, कर्मचारी वर्ग यांना काम करणे गैरसाेयीचे हाेत आहे. या अधिकारी व कर्मचारी वर्गास जागा नाही. अगदी छोट्या जागेत या कार्यालयाचा कारभार सुरू आहे. मात्र, अधिकारी व कर्मचारी वर्ग आपले छोटे घर सांभाळण्याची जशी जबाबदारी पार पाडतात. त्याप्रमाणे येथेही विनातक्रार काम करत आहेत. नगरपंचायत कार्यालयासाठी प्रशस्त इमारतीची प्रतीक्षा आहे.
शिराळा ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. या नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय महिला राखीव गटासाठी आरक्षित झाले. त्यामुळे या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांना बसण्यासाठी खोली, सभागृह, आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, कर वसुली आदी विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, मुख्याधिकारी, कर्मचारी आदींना जागा व स्वतंत्र दालन आवश्यक आहे. अग्निशामक दलासाठी जागा, नाट्यगृह आदी विविध विकासकामांसाठी जागा आवश्यक आहे. मात्र, अगदी छोट्या जागेत नगरपंचायतीचे काम सुरू आहे.
नगरपंचायत झाल्याने विविध पदे भरली गेली. नगरपंचायतीत मोठ्या संख्येने महिला अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. महिला अधिकारी असो वा कर्मचारी नगरपंचायतीच्या छोट्या जागेत विनातक्रार काम करत आहेत. नागरिक आपल्या कामासाठी या कार्यालयात आले तर त्यांना बसायला नाहीच, उभा राहायलाही जागा नसते. नगरपंचायतीला इमारतीची आवश्यकता आहे. कारण कार्यालयातील अधिकाऱ्यांना बसण्यासाठी वेगळे दालन नाही. तरीही अधिकारी विनातक्रार काम करत आहेत. लाेकप्रतिनिधींनी नगरपंचायत इमारतीचा प्रश्न साेडवावा, अशी मागणी हाेत आहे.
काेट
आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नगरपंचायत कार्यालयासाठी जागेची मागणी केली आहे. याबाबत त्याचा पाठपुरावा सुरूच आहे. मात्र, अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याचबरोबर अग्निशामक, नाट्यगृह आदी विकासकामांबाबतही जागेची आवश्यकता आहे. त्याकरिता शासन स्तरावर मागणी केली आहे.
- सुनीता निकम
नगराध्यक्षा, नगरपंचायत शिराळा