आष्टा : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या मुलाच्या खूनप्रकरणी आष्टा पोलिसांनी शिराळा पंचायत समितीच्या सदस्याला प्रेयसीसह मंगळवारी रात्री जेरबंद केले. अमरसिंह ऊर्फ अमर विश्वासराव पाटील (वय ३६, रा. बिळाशी, ता. शिराळा, सध्या राहणार परेल पश्चिम, मुंबई) व प्राची सुशांत वाजे (२९, रा. माळभाग, वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. मनन सुशांत वाजे (वय साडेतीन वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
इस्लामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे व पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून हे प्रकरण चर्चेत आहे. अमर पाटील शिराळा पंचायत समितीचा सदस्य आहे. तो कोकरूड गणातून निवडून आला आहे. त्याच्या विरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. वाळवा येथील सुशांत वाजे यांचा प्राचीसोबत प्रेमविवाह झाला आहे. त्यांना मनन हा मुलगा झाल्यानंतर प्राची वारंवार घरातून निघून जात असे. तिचे अमर पाटील याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय सुशांत वाजे यांना होता.ऑगस्ट ते ६ ऑक्टोबर या दरम्यान प्राची व मनन यांना अमरने मुंबई येथील घरी नेऊन ठेवले होते. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अमर व प्राची यांनी ६ ऑक्टोबर रोजी मननचा खून करून मोटारीतून (क्रमांक एमएच १३ एडी ८०८०) बिळाशी येथे आणून अंत्यसंस्कार केले व मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. मननचा मृत्यू मुंबईत झाला असताना दोघांनी बिळाशीच्या ग्रामसेवकाला हा मृत्यू बिळाशीत झाल्याची खोटी माहिती दिली.
यादरम्यान सुशांत वाजे यांनी दोघांविरोधात आष्टा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. बाबर व पथकाने मोबाईलवरील तांत्रिक माहितीच्या आधारे मुंबई व परिसरात माहिती घेऊन अमर पाटील यास आंबोलीतून, तर प्राचीला साकीनाका येथील लॉजमधून ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील मोटार जप्त करण्यात आली आहे.
अमरचे कारनामे
अमर पाटील हा मुंबईत राहणारा बिळाशीतील तालेवार असामी आहे. तो पंचायत समितीवर काँग्रेसमधून निवडून आला असून, स्वाभिमान संघटनेचा राज्य संघटक आहे. तो दरवर्षी बिळाशीच्या यात्रेत टीव्ही मालिकांमधील कलाकारांना आणत असे. त्याच्या विरोधात मुंबईतील मेघवाडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे.