विकास शहाशिराळा : शिराळा येथील प्रतीक शैलेंद्र काकडे या युवकाने नॅनो टेक्नॉलॉजी चा वापर करून सूर्यासिस (इसब) या भयावह त्वचारोगासाठी नवीन औषध प्रणाली निर्माण करून असा एक फॉर्मुला तयार केला आहे, ज्याचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे सूर्यासिस, फंगल इन्फेक्शन आणि इतरही त्वचारोग कमी खर्चात तसेच कमी वेळात बरे होण्यासाठी नवीन औषधे तयार केली आहेत.आजच्या धावपळीच्या विज्ञान युगात वेगवेगळ्या पद्धतीच्या औषध प्रणालीचा आणि नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून त्वचा, कर्करोग, क्षयरोग आणि एच. आय. व्ही अशा रोगांवर कमीत-कमी वेळात आणि खर्चात रुग्णांना बरे करण्यासाठी आणि रोगांपासून अंशतः किंवा पूर्णतः मुक्तता मिळवण्यासाठी औषध निर्माण विभागातील रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई यांचा मोलाचा वाटा आहे. पी.एच.डी चे शिक्षण पूर्ण केलेल्या प्रतिक काकडे यांनी आय. सी. टी येथे फार्मासिटिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी या विभागामधून पूर्ण केलेल्या पीएचडी मध्ये त्यांनी नॅनो टेक्नॉलॉजी चा वापर करून सूर्यासिस (इसब) या भयावह त्वचारोगासाठी नवीन औषध प्रणाली निर्माण केले. त्वचेचे आजार फार काळापर्यंत बरे होत नाहीत तसेच दीर्घ काळापर्यंत त्वचारोगासाठी औषध घ्यावी लागतात. या सगळ्याचा विचार करून आणि बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांचा परिणाम किती प्रमाणात होतो याचा अभ्यास करून नॅनोटेक्नॉलॉजी एक नवीन जीवन संजीवनी ठरेल या उद्देशाने त्यांनी या टेक्नॉलॉजीचा वापर त्यांच्या संशोधनामध्ये करून सूर्यासिस आणि फंगल इन्फेक्शन अशा त्वचा रोगांपासून मुक्तता मिळण्यासाठी औषध प्रणाली निर्माण केली आहे.या संशोधनासाठी त्यांना प्रधानमंत्री स्कॉलरशिप मिळाली आहे. विशेष म्हणजे, तयार केलेली औषध-प्रणाली आणि औषधे इतके चांगल्या पद्धतीने काम करत आहेत की या नवीन पद्धतीच्या औषध प्रणालीसाठी त्यांना पेटंट सुद्धा मिळाले आहे.वेगवेगळ्या रोगांसाठी नॅनो टेक्नॉलॉजीवरील पेटंट पुढील काळामध्ये नवीन येणाऱ्या ड्रग मॉलिक्युल चा वापर करून नवीन औषधे वेगवेगळ्या त्वचारोगांसाठी होऊ शकतो. तसेच सौंदर्य प्रसाधने तयार करताना ही टेक्नॉलॉजी वापरात येऊ शकते. तसेच तयार केलेल्या या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर त्वचारोग सोडून अजून वेगवेगळ्या मानवी रोगांसाठी वापरात यावा यासाठी त्यांच्या संशोधन ग्रुप चा प्रयत्न पुढील काळामध्ये असणार आहे. त्यांना डॉ.वंदना पत्रावळे , प्राचार्य डॉ. जॉन डिसूजा (वारणानगर) तसेच काकडे कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Sangli: शिराळ्याचा संशोधक प्रतीक काकडेने शोधले सोयरासीसवर औषध, 'नॅनो टेक्नॉलॉजी'चा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 6:32 PM