विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : राज्यात रेमडेसिविर, ऑक्सिजन, औषधे याबाबत गंभीर परिस्थिती असताना, शिराळा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय व कोकरूड ग्रामीण रुग्णालयात असणारी यंत्रणा सुसज्ज असल्याचे समाधानकारक चित्र सध्या तरी आहे. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाची नेमणूक केल्यास १८ व्हेंटिलेटरचीही सोय होईल.
व्हेंटिलेटरचा प्रश्न वगळता पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा आहे. आमदार मानसिंगराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, डॉ. जुबेर मोमीन, डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. नितीन जाधव, डॉ. योगिता माने, डॉ. ओंकार पाटील, डॉ. मनोज महिंद, आदी अधिकारी याबाबत सतर्क आहेत.
शिराळा उपजिल्हा रुग्णालयात सध्या ६ के. एल. क्षमतेचा ऑक्सिजन टँक भरलेला असून, तो २५ दिवस पुरतो. ७५ ऑक्सिजन बेडची येथे सुविधा असून, सध्या कोरोनाबाधित ५९ रुग्ण उपचार घेत आहेत. ३७ जंबो ऑक्सिजन सिलिंडर, १८ छोटे सिलिंडर व आवश्यकतेनुसार रेमडेसिविरही उपलब्ध आहे. सध्या रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन १, आयुष वैद्यकीय अधिकारी १४, नर्सिंग स्टाफ २० कार्यरत आहे.
रुग्णांना चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण दिले जाते. दोन रुग्णवाहिका सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रहार संघटनेची एक व्हॅनही येथे ऑक्सिजन सिलिंडरसह उपलब्ध आहे.
दरम्यान, शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयास तहसीलदार गणेश शिंदे यांनी ७०० मास्क, ७०० कॅप, मुबलक सॅनिटायझर, २५ बाॅडी रॅपिड, ४ ग्लुकोमीटर, १० बाॅक्स हँडग्लोज, याशिवाय इतर साहित्य दिले आहे.
चौकट.....
शिराळा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय आणि कोकरूड येथे ग्रामीण रुग्णालयाच्या तीस कोटी रुपये खर्चून मोठ्या इमारती उभ्या राहिल्या. या ठिकाणी १८ व्हेंटिलेटर आहेत. मात्र, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याने धूळ खात पडले आहेत. तालुक्यातील खासगी अथवा शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरची सोय नाही. कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे व्हेंटिलेटर सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.