शिराळा : शिराळा उपजिल्हा रुग्णालयातील सेवक भरतीबाबत आरोग्य मंत्र्यांशी लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाईल व आमदार निधीतून एक नवीन रुग्णवाहिका देणार आहे, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड व इतर आजारांवरील तपासण्यांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार नाईक म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन झाल्यानंतर काही कालावधित कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे येथील सेवक भरती रखडली. आता याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. उपजिल्हा रुग्णालयासाठी आमदार निधीतून एक रुग्णवाहिका देणार आहे. रुग्ण नसल्याने येथे सुरू केलेले कोविड सेंटर बंद केले आहे. पण येथील ग्रामीण रुग्णालयात कोविडसह इतर सर्व तपासण्या व उपचार करण्यात हयगय करू नये, अशी सूचना त्यांनी केली.
वैद्यकीय अधिकारी एक जागा रिक्त असून, त्याबाबत व कोविड लसीकरण मोहीम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत दूरध्वनीवरून आमदार नाईक यांनी चर्चा केली. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन, डॉ. विनायक धस, डॉ. गायत्री यमगर, डॉ. मनोज महिंद, डॉ. अनिरुद्ध काकडे यांच्यासह तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
फोटो-०२ शिराळा१फोटो ओळी : शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या बैठकीत आढावा घेताना आमदार मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे उपस्थित होते.