लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : शिराळा पश्चिम आणि उत्तर भागातील खरीप हंगामातील धूळवाफ पेरणीच्या पूर्वमशागतीला वेग आला असून, या महिन्यातील तीन मुहूर्तांवर पेरणी करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. कुटुंबातील सर्वजण कामाला लागले आहेत.
शिराळा पश्चिम आणि उत्तर भागांतील जमिनी निचऱ्याच्या आहेत. या परिसरात भात हे पारंपरिक पीक आजही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दरवर्षी या भागातील शेतकरी धूळवाफ पद्धतीने पेरणी करीत असतो. चांदोली अभयारण्य परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने चिखलगठ्ठा लागण पद्धतीने पेरणी करण्यात येते. शिराळी, कोमल, राधानगरी, इंद्रायणी, गंगा-कावेरी, आर-वन, पूनम, बलवान, आरजे-९५, मंजिरी बासमती, आदी भात बियाण्यांची पेरणी करण्यात येते. गेल्या १५ दिवसांत पावसाने चांगली हजेरी लावल्याने खरीप हंगामाच्या मशागतीला वेग आला आहे. कचरा, दगड-धोंडे वेचणे, कुळवणी, नांगरणी करण्याच्या कामाला वेग आला आहे. खरीप हंगामाच्या पेरणीचा मुहूर्त १८, २१, २५ मे असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली आहे.
धूळवाफ पेरणी म्हणजे काय?
एक-दोन उन्हाळी पाऊस पडल्यानंतर जमिनीत मुरलेले पाणी पूर्ण सुकल्यानंतर नांगरणी, कुळवणी करून मातीचे बारीक कण तयार होतात. त्या मातीत चार इंच खोलवर विविध प्रकारच्या भाताची पेरणी केली जाते. पेरणी केल्यानंतर एक महिना पाऊस उशिरा पडला तरी बियाणे खराब होत नसल्याने दरवर्षी या भागातील शेतकरी धूळवाफ पद्धतीने पेरणी करीत असतो.