विकास शहा - शिराळासांगली जिल्ह्यास तसेच शिराळा तालुक्याला भाजप-सेना युती सरकारचे मंत्रीपद मिळणार... मंत्रीपद मिळणार... असे म्हणत दोनवेळा हुलकावणी देण्यात आली. प्रत्येक मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी आश्वासनांची खैरात करण्यात आली. मात्र हा जिल्हा मंत्रिपदापासून वंचितच आहे. आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील शिराळा तालुका दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे पुन्हा येथील जनता मंत्रिपदाबाबत काय घोषणा करणार, याकडे येथील जनतेचे लक्ष लागले आहे. मंत्रिपदाबाबत खा. संजयकाका पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान शिवाजीराव नाईक यांना निवडून दिले, तर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले जाईल, असे ठोस आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून देण्यात आले. पण नाईक निवडून येऊनही त्यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आले. त्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराप्रसंगी रात्री साडेअकरापर्यंत त्यांना मंत्रीपद निश्चित होते. मात्र सांगली जिल्ह्यातील भाजपचे जुने आ. सुरेश खाडे यांनीही मंत्रिपदासाठी टोकाची भूमिका घेतल्याने, यावेळी सांगली जिल्ह्यात मंत्रीपद मिळाले नाही, तर दुसऱ्यावेळी कुणाला जिल्ह्यात मंत्रीपद मिळणार याची उत्सुकता असताना, पुन्हा मंत्रीपद मिळाले नाही. कॉँग्रेस सरकारच्या काळात तीन ते चार मंत्रीपदे या जिल्ह्याला मिळाली होती. राज्याच्या राजकारणातही सांगलीचा दबदबा कायम होता. पण युतीच्या काळात सांगली जिल्ह्याला पूर्णत: डावलण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील, राम शिंदे, विनोद तावडे हे जिल्ह्याच्या प्रत्येक दौऱ्याप्रसंगी, मंत्रीपद देण्यात येईल, अशी घोषणा करतात. या जिल्ह्यात भाजप व मित्रपक्षांचे आज दोन खासदार, तर चार आमदार आहेत. कॉँगे्रसच्या बालेकिल्ल्यास मोठे खिंडार येथे पडले असतानाही, या जिल्ह्याकडे भाजपकडून दुर्लक्ष केले आहे.खाडे हे भाजपचे जुने आमदार आहेत. त्यामुळे ते मंत्रिपदावर आपला हक्क सांगत आहेत. तसेच आ. नाईक हे युती शासनात राज्यमंत्रिपदावर होते. तसेच जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची पकड आहे. संपूर्ण प्रशासनाची माहिती असणारी अभ्यासू, अनुभवी व्यक्ती म्हणून त्यांना मंत्रीपद मिळावे, यासाठी प्रयत्न केले आहेत. आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप हे मंत्रिपदाबाबत जास्त न चर्चा करता, आपणासही मंत्रीपद मिळायला काय हरकत?, असे म्हणून मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त करीत आहेत.संजयकाका यांची भूमिका काय? भाजपचे खासदार तसेच जिल्ह्याच्या राजकारणात आपली पकड मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. तेही आपल्यास मिळत्याजुळत्या आमदारांना मंत्रीपद मिळावे, तसेच तो वरचढ होऊ नये याची काळजी घेत तर नाहीत ना? अशी चर्चाही जिल्ह्याच्या राजकारणात चालू आहे.आज शिराळा येथे यशवंत दूध संघाच्या पायाभरणी समारंभप्रसंगी पालकमंत्री पाटील, संजयकाका, शेट्टी हे तीनही मंत्रीपद ठरविणारे नेते एकत्र एका व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे मंत्रिपदाबाबत ते काय बोलतात, याकडेच साऱ्यांचे लक्ष आहे.सदाभाऊ खोतही मंत्रिपदाच्या प्रतीक्षेतचभाजप सहयोगी पक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद देण्याबाबतही चर्चा झाली. मात्र तेही अजून मंत्रिपदाची वाट पाहत आहेत. युती शासनाचे सहयोगी असून शेतकरी प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करणाऱ्या या पक्षाकडेही अजून भाजपने दुर्लक्ष केले आहे. राजू शेट्टी हेही शिराळा तालुक्यात या सर्वांबरोबर उपस्थित असल्याने, त्यांची भूमिका काय? याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
शिराळ्याला मंत्रीपद मिळणार... पण कधी?
By admin | Published: March 05, 2016 12:03 AM