लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप अशी तिरंगी लढत होत असून, गुरुवारी अर्ज माघारीच्या शेवटच्यादिवशी आठ अपक्ष व भाजपच्या एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. भाजपने महाडिक युवा शक्तीबरोबर युती केली आहे. १७ प्रभागांमध्ये ५० मुख्य राजकीय पक्षांचे, तर ६ अपक्ष असे ५६ उमेदवार रिंगणात आहेत. या लढतीत प्रामुख्याने प्रभाग दोनमधील लढतीकडे सर्व राजकीय नेत्यांचे व नागरिकांचे लक्ष आहे.गुरुवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे गेले तीन-चार दिवस राजकीय चर्चा, अर्ज माघारी, आघाडी कोणाबरोबर करायची व कशी करायची, याची चर्चा अगदी दुपारी दोन वाजेपर्यंत चालूच होती. कॉँग्रेसने प्रथम भाजपबरोबर व नंतर राष्ट्रवादीबरोबर आघाडीसाठी चर्चा केली. मात्र ही चर्चा यशस्वी झाली नाही. बुधवार दि. १० रोजी भाजपचे रणजितसिंह नाईक, महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक, केदार नलवडे यांच्यात चर्चा होऊन, महाडिक युवा शक्तीने भाजपला पाठिंबा दिला. यामध्ये प्रभाग १४ मधील भाजप उमेदवार वैभव कांबळे यांनी माघार घेऊन महाडिक युवा शक्तीचे रामचंद्र जाधव यांना भाजप पुरस्कृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. या अपक्ष उमेदवारासह पाच प्रभागात सहा अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत, तर १२ प्रभागात तिरंगी लढत होणार आहे.प्रभाग ७ मध्ये मीनाक्षी यादव, प्रभाग १० मध्ये दीपक गायकवाड, प्रभाग ११ मध्ये मंदार उबाळे, प्रभाग १४ मध्ये रामचंद्र जाधव व अनिल माने, प्रभाग १६ मध्ये दिलीप घाटगे असे सहा अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. हे अपक्ष उमेदवार राजकीय पक्षांची डोकेदुखी बनणार आहेत. अनेक प्रयत्न करुनही त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी झालेले प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. या अपक्षांचा फटका कोणाला बसणार, याचीच चर्चा आता सुरु झाली आहे.प्रभाग दोनमध्ये दोन नाईक घराण्यात होणारी लढत ही प्रमुख लढत मानली जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान रणजितसिंह नाईक यांच्या कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांचे लहान बंधू अभिजित नाईक यांच्याविरुध्द त्यांचे पुतणे व माजी पं. स. सभापती अॅड. भगतसिंग नाईक यांचे पुत्र विश्वप्रतापसिंग नाईक या काका-पुतण्यांची लढत होत आहे.याचबरोबर प्रभाग ८ मध्ये दोन सख्ख्या भावजयींची लढत आहे. राष्ट्रीय कॉँग्रेसतर्फे अर्चना कदम, तर भाजपतर्फे नंदाताई कदम यासख्ख्या जावांमध्ये लढत होत आहे. येथे राष्ट्रवादीतर्फे अर्चना शेटे यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. याचबरोबर नगराध्यक्ष पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव असल्याने प्रभाग चारमध्ये चित्रा दिवटे (कॉँग्रेस), राजश्री यादव (भाजप), रंजना यादव (राष्ट्रवादी), प्रभाग ६ मध्ये सीमा कदम (भाजप), रहिमतली मुल्ला (कॉँग्रेस) व ज्योती शेटे (राष्ट्रवादी) या दोन प्रभागातील विजयी उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी पात्र ठरणार असल्याने या दोन प्रभागातील लढत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ही तिरंगी होणारी लढत सर्वत्र चुरशीची ठरणार, हे नक्की असल्याची चर्चा आहे.
शिराळा नगरपंचायतीसाठी तिरंगी लढत
By admin | Published: May 11, 2017 11:21 PM