कडेगाव ,दि. २३ : शिरसगाव (ता. कडेगाव) येथील ग्रामसभेच्या ठरावाला गावातील अवैध दारू विक्रेत्यांनी केराची टोपली दाखवत गावातील अवैध दारू विक्री सुरूच ठेवल्याने, अखेर संतप्त ग्रामस्थांनीच धडक देत अवैध दारू विक्री अड्डा उद्ध्वस्त केला.
ग्रामस्थांनी ११७ देशी संत्रा दारूच्या बाटल्या अशा ५८५० रुपये किमतीच्या मुद्देमालासह अवैध दारू विक्रेता प्रताप प्रकाश सपकाळ (वय ३२, रा. शिरसगाव) यास पोलिसांच्या ताब्यात दिले .
कडेगाव तालुक्यातील शिरसगाव येथील अवैध दारू विक्री व्यवसाय बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत केला आहे. मात्र चिंचणी वांगी पोलिस ठाणे, तहसीलदार, राज्य उत्पादन शुल्क विभागाने या अवैध गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात वेळकाढूपणाचे धोरण अवलंबल्याने येथील तरुणांनी, महिलांनी व ग्रामस्थांनी एकत्र येत अवैध दारू विक्री सुरू असलेल्या अड्ड्यावर हल्लाबोल केला.
यावेळी पोलिसपाटील प्रवीण मांडके यांनी ग्रामस्थांना, कायदा हातात घेऊ नका, पोलिसांना बोलावून मुद्देमालासह अवैध दारू विक्रेत्याला ताब्यात द्यावे, असे आवाहन केले. पोलिस पाटलांच्या आवाहनास प्रतिसाद देत सरपंच सतीश मांडके व ग्रामस्थांनी तब्बल ११७ देशी संत्रा बाटल्यांसह दारूविक्रेत्यास ताब्यात दिले व त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
चिंचणी-वांगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत संबंधितांवर गुन्हे नोंदविण्याचे आश्वासन दिले व मुद्देमालासह दारूविके्रता प्रताप प्रकाश सपकाळ यास ताब्यात घेतले. ग्रामसभेत एकमुखी ठराव झाला. तरीही संबंधित व्यावसायिकाने आपली मुजोरी कायम ठेवत सर्रास व्यवसाय चालूच ठेवला.
संबंधित पोलिसांना याबाबत माहिती दिली तरीही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष होता. दरम्यान, पोलिसांनी प्रताप सपकाळ याच्याविरुद्ध चिंचणी वांगी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोज सोलवनकर करीत आहेत.
नागरिकांना उपद्रव
दारुचा व्यवसाय हा महादेव मंदिरालगत असलेल्या सपकाळ याच्या घरातून चालतो. यामुळे या परिसरात नेहमी तळीरामांची वर्दळ असल्याने परिसरातील नागरिकांना याचा उपद्रव सहन करावा लागत होता. गावातील ग्रामसभेत गावातील अवैध गावठी दारूबंदीसाठी ठराव करण्यात येऊन, त्यासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली. याबाबतचा तपशील संबंधित विभागाला देऊन मदतीची मागणी करण्यात आली.