अथणी : महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील खोतवाडी (ता. अथणी) येथे किरकोळ कारणातून सख्ख्या चुलत भावांचा खून करण्यात आला. त्यापैकी एकजण ग्रामपंचायत सदस्य आहे. जमिनीच्या वादातून दोघांनी परस्परांना संपविल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.मंगळवारी (दि. २३) सकाळी ही घटना उघडकीस आली. या खुनामुळे सीमाभागात एकच खळबळ उडाली आहे. शिरुर (ता. अथणी) ग्रामपंचायत हद्दीत खोतवाडी ही छोटी वाडी आहे. तेथे सोमवारी रात्री कन्नड शाळेपासून काही अंतरावर खंडू तानाजी खोत (वय २५) व हनुमंत रामचंद्र खोत (वय ३७) ही चुलत भावंडे जखमी अवस्थेत पडल्याचे ग्रामस्थांना आढळून आले. दोघेही अत्यवस्थ अवस्थेत तडफडत होते. ग्रामस्थांनी नातेवाईकांना माहिती दिली, त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेले. पण दोघेही मरण पावल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.कवठेमहांकाळ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अथणी पोलिसांनी माहिती दिली, त्यानंतर फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद, उपाधीक्षक श्रीपाद जलदे, मंडल पोलिस निरिक्षक रवींद्र नायकवडी, उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी मंगळवारी कवठेमहांकाळ रुग्णालयात जाऊन मृतदेहांची पाहणी केली. गुळेद यांनी घटनास्थळीही भेट दिली. घटनेची कसून चौकशी केली जाईल. यदाकदाचित कोणी संशयित असतील, तर त्यांना गजाआड करू असे सांगितले.जमिनीचा वाद?खोत कुटुंबामध्ये ४० एकर शेतजमीन आहे. जमिनीच्या वादातून या भावंडांत काही वर्षांपासून संघर्ष सुरु होता. शाब्दिक चकमकी व किरकोळ बाचाबाचीही झाली होती. त्यातूनच दोघांनी परस्परांवर हल्ला केला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मारामारीसाठी चाकूचा वापर करण्यात आला आहे. एकाच्या अंगावर चार वार, तर दुसऱ्याच्या मृतदेहावर सहा वार आढळले आहेत. दोघांपैकी हनुमंत हे शिरुर ग्रामपंचायतीचे सदस्य होते.
Sangli: शिरुर ग्रामपंचायत सदस्याचा भावासह खून, जमिनीच्या वादातून मारामारीचा अंदाज
By संतोष भिसे | Published: July 23, 2024 7:30 PM