बिळाशी : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील भारतीय वाणिज्य दूतावास जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी दुमदुमून गेला. निमित्त होते शिवजयंतीचे. छत्रपती फाउंडेशन, भारतीय वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल ताशा समूह यांनी संयुक्तपणे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांपैकी कोकरूड तालुका शिराळा येथील डॉक्टर युनूस मुबारक अत्तार, कल्याण घुळे पाटील (औरंगाबाद ), सुरेश गायकवाड (तडवळे, शिराळा), स्वप्नील खेडेकर, पुणे, विनोद झेंडे ( बारामती), विजय मानकर यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला शिवजयंती कार्यक्रमाला न्यूयॉर्क, न्यूजर्सी, पेनिसेल्विनिया आदी सभोवतालच्या राज्यातूनही शिवभक्त उपस्थित होते. यावेळी अल्बाणी ढोलताशा समूहाच्या कलाकारांनी शिवजन्म शिवराज्याभिषेकाचे प्रयोग सादर केले. यासोबतच तबला, वीणा वादनासह संगीताची मैफल रंगली.अमेरिकेतील उद्योगपती आणि काँग्रेस सॉफ्टवेअर समूहाचे सीईओ मनोज शिंदे यांनी अमेरिकन कार्पोरेट जगतातील भारतीयांच्या योगदानाचा गौरव केला. मराठी तरुणाईला व्यवसायात उतरण्याचे आवाहन केले. स्वागत व प्रस्ताविक छत्रपती फाऊंडेशनचे संचालक स्वप्नील खेडेकर यांनी केले. सूत्रसंचालन कल्याण धुळे -पाटील, डॉ. युनूस अत्तार यांनी केले. आभार विनोद झेंडे यांनी मानले. यावेळी सुरेश गायकवाड, महेश शिंदे, गौरी शिंदे (कुडाळ), प्रांजल भूषण, निखिल शेटे (कोल्हापूर ), सौरभ शेंडे, विजय मानकर, कुणाल वांकर, रोहित गवळी, मुज्जमील मुकादम (रत्नागिरी) आदींसह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
अमेरिकेत शिवरायांचा असाही अभिमानगेल्या आठ वर्षांपासून न्यूयॉर्क छत्रपती प्रतिष्ठानतर्फे आणि भारतीय दूतावासाच्या सहकार्याने शिवजयंती साजरी केली जाते. छत्रपतींच्या इतिहासाचा जागर अमेरिकेत केला जातो. सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करतो. डॉ. युनूस अत्तार हे न्यूयॉर्क शहरात वाहतूक निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.