म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथे शनिवारी शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेनेच्या वतीने आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व कोविड योद्धे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाप्रमुख संजय विभूते, बजरंग पाटील सतीश नलवडे यांच्यासह शिवसैनिकांनी कोरोना विलगीकरण केंद्रास भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.
शेतकरी, उद्योजक, नोकरदार, कामगार, विधवा, वयोवृद्धांच्या अडचणी जाणून प्रमुख मार्गावरून नागरिकांशी संवाद साधला. गावातील प्रमुख संस्थेत, सोसायटीमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अडीअडचणी समजावून घेतल्या. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या. उद्धव ठाकरे सरकार गोरगरीब लोकांच्या झोपडीपर्यंत पोहाेचवायचे आहे. आपणास सामान्य लोकांची कामे करायची आहेत, असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी यावेळी केले.
यावेळी बजरंग पाटील, संजय ताटे, मिरज तालुकाप्रमुख विशालसिंह रजपूत, सुनीता मोरे, रामदास कोरवी, संजय बागल, भय्या गायकवाड, अवधूत नलवडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन म्हैसाळ शिवसेनेचे विभागप्रमुख सतीश नलावडे यांनी केले हाेते.