सांगली : राज्यातील काँग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचा फॉर्म्युला सांगलीजिल्हा परिषदेत चालणार नाही, असा विश्वास जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच जिल्हा परिषदेत शिवसेना भाजप बरोबर सत्तेत राहणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तेची स्वप्ने पाहू नये, अशी टीकाही देशमुख यांनी केली. जिल्हा परिषदेत बुधवारी झालेली सर्वसाधारण सभा विद्यमान पदाधिकाऱ्यांची शेवटची होती. यावेळी संग्रामसिंह देशमुख बोलत होते.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच राज्यात झालेल्या सत्तांतराबद्दल भाजपच्या नेत्यांवर बोचरी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे 'मी पुन्हा येईन' असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणू नये, असा टोला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभागृहात लगावला.
या टीकेचा समाचार घेताना संग्रामसिंह देशमुख महणाले, राज्याच्या विधानसभेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे समीकरण निर्माण करून सता स्थापन केली आहे. येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेतील पदाधिकारी निवडी कार्यक्रम होईल. अध्यक्षपदाचे आरक्षण बदलले असल्याने नव्याने निवडी होतील. सध्या भाजप, शिवसेना आणि अन्य आघाडी अशी सत्ता आहे. भाजपचा अध्यक्ष व उपाध्यक्षपद सेनेकडे आहे. नव्या निवडीवेळी शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील समीकरण जिल्हा परिषदेत येऊ नये, अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली.
भविष्य काळातही योग्य पद्धतीने निवडी होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. राज्यात कशीही महाविकास आघाडी झाली असली तरी, शिवसेनेचे सुहास बाबर त्यांच्या तीन सदस्यांसह भाजप बरोबर राहणार आहेत. बाबर यांच्या सदस्यांवर कुणी सत्ता स्थापनेचे गणित मांडू नये. अशी टीका देशमुख यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर केली. तसेच 'मी पुन्हा येईन' या शब्दामध्ये सकारात्मक दृष्टिकोन असून, तो प्रत्येकाने बाळगण्यास काहीच हरकत नाही, असेही त्यांनी यावेळी विरोधकांना सुनावले.
यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती डॉ. सुषमा नायकवडी. अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी पाटील, ब्रह्मदेव पडळकर, डी. के. पाटील, प्रमोद शेंडगे, जगन्नाथ माळी, अॅड. शांता कनुंजे, अरुण बालटे, कडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंदाताई कारंडे, सरदार पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे आदी उपस्थित होते.