Sangli Politics: काँग्रेसच्या बालेकिल्यात शिवसेनेची मशाल!, काँग्रेसचे नेते बंडाच्या तयारीत

By वसंत भोसले | Published: March 22, 2024 12:18 PM2024-03-22T12:18:43+5:302024-03-22T12:19:23+5:30

सांगली लोकसभा मतदारसंघाची दोन पोटनिवडणुकांस एकूण एकोणीस वेळा निवडणूक झाली. यापैकी अठरा निवडणुका काँग्रेसने लढवल्या

Shiv Sena announced the candidature of wrestler Chandrahar Patil in Sangli Lok Sabha constituency | Sangli Politics: काँग्रेसच्या बालेकिल्यात शिवसेनेची मशाल!, काँग्रेसचे नेते बंडाच्या तयारीत

Sangli Politics: काँग्रेसच्या बालेकिल्यात शिवसेनेची मशाल!, काँग्रेसचे नेते बंडाच्या तयारीत

डॉ. वसंत भोसले

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाची दोन पोटनिवडणुकांस एकूण एकोणीस वेळा निवडणूक झाली. यापैकी अठरा निवडणुका काँग्रेसने लढवल्या आणि सोळा वेळा विजय मिळवला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा हा बालेकिल्ला असताना शिवसेनेने उमेदवारीचा हट्ट करून गुरुवारी महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी देखील मिरजेच्या सभेत जाहीर केली.     

सांगली लोकसभा मतदारसंघाची निर्मिती १९५२ मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासूनच झाली आहे. १९५२ ते २०१९ पर्यंत दोन वेळा झालेल्या पोटनिवडणुकांसह एकोणीस निवडणुका पार पडल्या आहेत. विसाव्या निवडणुकीला सामोरे जात असताना काँग्रेसला उमेदवारी मिळणे मुश्किल होऊन बसले आहे. हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. कारण या एकोणीस पैकी सोळा वेळा काँग्रेसने विजय मिळविला आहे.

१९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत शेतकरी कामगार पक्षाचे ऍड. बाळासाहेब पाटील यांनी काँग्रेसचा पराभव केला होता.  त्यानंतर सलग २००९ पर्यंत दोन पोटनिवडणुकांसह काँग्रेसने हा बालेकिल्ला कायम सांभाळला होता. २०१४ च्या भाजपच्या लाटेमध्ये खासदार संजयकाका पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा पराभव केला. मागील २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला या मतदारसंघातून उमेदवारी देखील मिळाली नाही. हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आला.         

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  ऐनवेळेला काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना उमेदवारी दिली. वंचित बहुजन आघाडीने भाजपचे बंडखोर उमेदवार गोपीनाथ पडळकर यांना उमेदवारी दिली. प्रामुख्याने तिरंगी झालेल्या या निवडणुकीत संजयकाका पाटील यांनी विशाल पाटील आणि पडळकर यांचा पराभव केला.  

विशाल पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. मात्र त्या निवडणुकीत प्रथमच काँग्रेसचे चिन्ह नव्हते. ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांनी १९८० मध्ये प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर २००९ पर्यंत दोन पोटनिवडणुकांसह सांगली मतदारसंघाच्या अकरा निवडणुका पार पडल्या. 

या सर्व निवडणुका वसंतदादा पाटील आणि त्यांच्या घराण्यातील व्यक्तीने लढवल्या आणि त्या जिंकल्या. त्यामध्ये वसंत दादा पाटील यांच्या पत्नी श्रीमती शालिनीताई पाटील, चिरंजीव प्रकाशबापू पाटील, नातू मदन पाटील आणि प्रतीक पाटील यांचा समावेश होता. शालिनीताई पाटील यांनी १९८३ झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये जनता पक्षाचा पराभव केला होता. प्रकाशबापू पाटील यांनी पाच वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधनामुळे २००५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनी विजय मिळवला. शिवाय त्यांनी २००९ मध्ये विजय मिळवून केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदाची जबाबदारी देखील स्वीकारली. 

सांगलीला प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळ स्थान मिळाले होते. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसलाच उमेदवारी मिळेल, असे मानले जात असताना कोल्हापूरची जागा शिवसेनेने काँग्रेसला सोडल्याच्या बदल्यात सांगलीची जागा मागून घेतली. दरम्यान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेने त्यांना कालच मिरजेच्या जाहीर सभेत उमेदवारी जाहीर करून टाकली.  महाविकास आघाडीचा राजधर्म पाळायचा असेल तर काँग्रेसला या निवडणुकीत सांगली मतदारसंघातून स्थानही मिळणार नाही आणि बंडखोरी केली तर विशाल पाटील यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. 

अशा परिस्थितीत पुन्हा एकदा काँग्रेसचा उमेदवार सांगली या बालेकिल्लामध्ये असणार नाही. एकेकाळी महाराष्ट्राचे नेतृत्व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वसंतदादा पाटील यांनी केले होते. त्यांच्या नावाच्या वलयामुळे नेहमीच काँग्रेसला जनतेने साथ दिली. पक्षश्रेष्ठींनी वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील व्यक्तीसाठीच उमेदवारी जणू राखून ठेवली होती. ही परंपरा श्रीमती इंदिरा गांधी पासून ते श्रीमती सोनिया गांधी यांच्यापर्यंत कायम होती. भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचे तासगाव- चिंचणीच्या पाटील घराण्याची परंपरा देखील काँग्रेसचीच आहे.संजयकाका पाटील यांचे चुलते दिनकरआबा पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी तासगावचे तीन वेळा विधानसभेवर प्रतिनिधित्व केले होते. 

सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचा कधी लोकसभेला पराभव होईल, असे विरोधक देखील मानत नव्हते. पण हाच मतदारसंघ आघाडीच्या राजकारणामुळे मागे पडला आणि आता तर या पक्षाला उमेदवारी मिळणे देखील मुश्किल झाले आहे. या विरुद्ध काँग्रेसचे स्थानिक सर्व नेते बंडाच्या तयारीत असून विद्यमान जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी पक्ष विसर्जित करून अपक्ष निवडणूक लढू, असा इशारा दिलेला आहे. एके काळी हा बालेकिल्ला गावागावांच्या ग्रामपंचायती पासून जिल्हा पातळीवरील सर्व संस्था आणि विधानसभा तसेच विधान परिषद,  लोकसभा आधी निवडणुकांमध्ये वर्चस्व गाजविले होते. वर्चस्व गाजवले होते त्या पक्षाला शिवनेरी शिवसेनेच्या उमेदवारीमुळे उपेक्षित राहावे लागत आहे, याचे आश्चर्य वाटते.

दादांचा उमेदवार मतदारांचे मतदान!    
      
सांगली लोकसभा मतदारसंघ म्हणजे वसंतदादा पाटील यांनी उमेदवार द्यायचा आणि मतदारांनी त्याला मतदान करायचे असा जणू शिरस्ता होता. १९५२ ते १९७७ पर्यंत असेच होत होते. १९७७ च्या जनता पक्षाच्या लाटेत देखील काँग्रेसचे अण्णासाहेब गोटखिंडे यांनी विजय मिळविला होता. व्यंकटराव पवार १९५२… विजयसिंह राजे डफळे-१९६२… एस. डी. पाटील - १९६७… अण्णासाहेब  गोटखिंडे - १९७२ - अण्णासाहेब गोटखिंडे - १९७७. वसंतदादा पाटील यांनी १९८० मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आग्रहाने लोकसभेची एकमेव निवडणूक लढवली. त्यानंतर सलग दहा निवडणुका त्यांच्या घरातील व्यक्तींनीच लढवल्या आणि जिंकल्या या सर्व निवडणुका चुरशीने झाल्या… पण विजय काँग्रेसचा असायचा.

शिवसेनेचे आजवर एकमेव आमदार..!   

ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील आणि शिवसेना यांचे खूप जवळचे नाते होते.  त्यामुळे शिवसेनेने कधीही सांगली जिल्ह्यात दादांच्या राजकारणाला धक्का बसेल असे काम केले नाही किंबहुना निवडणुका ही ताकदीने लढविल्या नाहीत. परिणामी सांगली जिल्ह्यात शिवसेना कधीही वाढली नाही २०१९ च्या निवडणुकीत प्रथमच पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते अनिल बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश करून खानापूर विधानसभा मतदारसंघातून पहिला विजय मिळवून दिला. शिवसेनेत फूट पडली. त्यावेळेला अनिल बाबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले.  त्यामुळे शिवसेनेची आता तरी पाटी कोरीच आहे. त्यांचे गेल्या ३१ जानेवारी रोजी निधन झाले.

Web Title: Shiv Sena announced the candidature of wrestler Chandrahar Patil in Sangli Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.