मिरज : मिरजेत आर्थिक वादातून शिवसेना शिंदे गटाचा समन्वयक मतीन दाऊद काझी (वय ३२) याच्यासह हॉटेलचालक दाम्पत्यावर हॉटेलमध्ये कोयत्याने हल्ला करण्यात आला. यात मतीन काझी याच्यासह हॉटेलचालक व त्यांची पत्नी जखमी झाले. या घटनेमुळे संतप्त काझी समर्थकांनी एजाज शेख व त्याच्या साथीदारांच्या घरावर हल्ला चढवून मोडतोड केली. दोन गटांत राड्यामुळे मिरजेत काहीकाळ तणाव होता.मिरजेत टाकळी रोडवर रवींद्र येसुमाळी यांचे रस्सा नावाचे हॉटेल आहे. हॉटेलचालक येसुमाळी यांनी पिंटू सय्यद या कामगाराचा पगार दिला नसल्याचा वाद सुरू होता. या वादातून मिरजेतील एका खून प्रकरणातील आरोपी एजाज शेख व त्यांचे साथीदार अमन गोदड, सोहेल नदाफ, शंकर रिक्षावाला व शिव अथणीकर यांनी शनिवारी रात्री हॉटेलवर जाऊन जोरदार राडा केला. हॉटेलचालक रवींद्र येसुमाळी व त्यांची पत्नी वैशाली येसुमाळी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.यावेळी शिवसेना शिंदें गटाचा पदाधिकारी मतीन काझी याने मध्यस्थीचा प्रयत्न केल्याने हल्लेखोरानी काझी याच्याही हातावर कोयत्याने हल्ला केल्याने काझी याच्यासह तिघे जखमी झाले. सर्वांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये नेण्यात आल्यानंतर काझी समर्थकांनी सिव्हील आवारात मोठी गर्दी केली. तणाव वाढत असल्याने पोलिसांनी जादा कुमक मागवून जमावाला पांगविले. मतीन काझी समर्थकांनी मध्यरात्री सुभाषनगर व टाकळी रस्त्यावर एजाज शेख, अमन गोदड, इकलास खाटीक या तिघांच्या घरावर हल्ला करून घरातील साहित्याची तोडफोड, दुचाकी व चारचाकी वाहनांची मोडतोड केली. याप्रकरणी शहर पोलिसात मतीन काझी याने अमन गोदड, शिव अथणीकर सोहेल नदाफ व त्याच्या दोन साथीदारांनी कोयत्याने हल्ला केल्याची फिर्याद दिली आहे. हॉटेलात कोयत्याने केलेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज शहरात व्हायरल झाले होते. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
Sangli: मिरजेत शिवसेना पदाधिकाऱ्यासह हॉटेलचालक दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 12:28 PM