सांगली: शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सोमवारी सांगलीत महागाई व गद्दारीची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात ही होळी करण्यात आली. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर म्हणाले की, दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. गॅस सिलिंडर हा १२०० रुपयांच्या जवळपास जाऊन बसलाय. कमर्शियल गॅस साडेतिनशे रुपये महाग झालेला आहे. पूर्वी हॉटेलमध्ये खाणे परवडत नव्हते, आता घरात खाणेही परवडत नाही.
सर्वसामान्य माणसांचे बजेट कोलमडले आहे. गृहिणी त्रस्त आहेत. ज्या मुद्द्यावर केंद्रातले सरकार सात वर्षे सत्ता उपभोगत आहेत ते सरकार महागाईचा मुद्दाच विसरून गेले आहे. लोकांसमोर महागाईचे मुद्दे आले की पाकिस्तानमध्ये अडिचशे रुपये कांदा आहे म्हणून सांगितले जाते. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडत आहेत. त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो. महागाई व गद्दारी यांची होळी करुन जनतेच्या संतापाला वाट मोकळी करीत आहोत. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुजा इंगळे, शहर समन्वयक प्रसाद रिसवडे, अमोल कांबळे, किरण पवार, अनिल शेटे, मनीषा पाटील, सरोजिनी माळी, नीतू चव्हाण, सुनीता पाटील, शकीरा जमादार, स्नेहलता माळी, मीनाक्षी पाटील, महादेवी केंगार, रुमाना शिकलगार, सौ. सुजाता हुद्दार, गजानन हंकारे, भगवानदास केंगार, विजय बल्लारी, अमित पवार, युवराज मोने, प्रतीक पाटील, सुरज पवार, सुमित पवार, संजय वडर, सागर शिंदे, प्रथमेश शेटे, किशोर सासणे, विशाल गोसावी, धनाजी कोळपे उपस्थित होते.