सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला सोडणार नाही, विश्वजित कदमांनी मांडली ठाम भूमिका
By हणमंत पाटील | Published: March 18, 2024 05:02 PM2024-03-18T17:02:25+5:302024-03-18T17:04:47+5:30
कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला देण्यावर एकमत
सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी सांगलीच्या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे. परंतु, सांगलीची जागा आम्ही अजिबात सोडणार नाही, त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, अशी ठाम भूमिका काँग्रेस आमदार व माजीमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आज मुंबईत मांडली.
सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला देण्यावर एकमत झाले आहे. त्यामुळे जिल्हा कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. डॉ. विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील व जयश्री पाटील यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांची मुंबई येथे सोमवारी भेट घेतली. या वेळी सांगलीची जागा कॉंग्रेसला घेण्याची आग्रहाची भूमिका मांडली.
त्यानंतर डॉ. कदम म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसच्या विचारांचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे आपली ताकद नसताना महाविकास आघाडीमधील कोणत्याही मित्रपक्षांनी दावा करू नये. आम्ही सांगलीच्या जागेसाठी ठाम आहोत. ही जागा आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. कारण सांगलीकरांनी यावर निर्णय घेतला आहे. काँग्रेसची या ठिकाणी स्थानिक स्वराज संस्थेमध्ये ताकद आहे. संजय राऊत हे शिवसेना पक्षाचे नेते आहेत. ते वैयक्तिक काही सांगत असले तरी तो त्यांचा प्रश्न आहे. ते आघाडीची भूमिका मांडू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांना भेटून आमची सांगलीच्या जागेची तीव्र भूमिका मांडलेली आहे.
जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व काय ?
पैलवान चंद्रहार पाटील आमचे मित्र आहेत. परंतु, काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला हे वास्तव आहे. सांगलीतील ६०० गावात शिवसेनेचे अस्तित्व काय आहे, याचा नेत्यांनी विचार करून किती ताणायचे हे ठरवावे. कॉंग्रेसने ज्याप्रमाणे दुष्काळाच्या प्रश्नावर मोर्चे काढले, तसे इतरांनी काढले का ? याचाही विचार व्हावा, असे विश्वजीत कदम यांनी सांगितले.