महावितरणतर्फे थकीत बिलासाठी ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यांत येत आहे. महावितरण कर्मचाऱ्यांनी मिरजेत एका कोरोना मृताच्या घराचे वीज कनेक्शन तोडण्याच्या कारवाईचा शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला. शिवसेना कार्यकर्त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. मिरजेत पिरजादे प्लॉटमधील एका कुटुंबातील एक व्यक्ती कोरोनाने काही दिवसापूर्वी मृत झाला आहे. मृताच्या घरातील अन्य दोघे कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्या घरातील वीज कनेक्शन तोडण्यात आल्याची तक्रार शिवसेना कार्यकर्ते व नागरिकांनी केली. सामान्य नागरिक अगोदरच कोरोनामुळे संकटात असताना मृतांच्या कुटुंबीयांनाही सहानुभूती दाखवीत नसल्याबद्दल महावितरणचा निषेध करण्यात आला.
विद्युत अधिनियमातील तरतुदीनुसार कोणतीही नोटीस न देता वीज पुरवठा खंडित करणे बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केला. सध्या परिस्थिती बिकट असून मजुरी करणाऱ्यांचा विचार करून महावितरणने वीज थकबाकीदारांना १५ दिवस अगोदर नोटीस देऊन वीज पुरवठा खंडित करावा, या मागणीसाठी मिरज शहर शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शिवसेना शहराध्यक्ष चंद्रकांत मैगुरे, तालुकाप्रमुख विशालसिंग राजपूत, विजय शिंदे, किरण रजपुत, गजानन मोरे, महिला आघाडीच्या रुक्मिणी आंबीगिरी, सुहाना नदाफ, मंदाकिनी जगताप, महादेव हुलवान, रमेश नाईक, अतुल रसाळ, दिलीप नाईक, अमर कोळी, इस्माईल जातकार, प्रकाश जाधव, अनिल पाटील, मुस्लिम लष्करी सहभागी होते.