सांगली लोकसभेच्या जागेची मागणी शिवसेनेची, राष्ट्रवादीचा संबंध नाही; जयंत पाटीलांनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 06:00 PM2024-03-13T18:00:14+5:302024-03-13T18:00:45+5:30

मुलाच्या उमेदवारीला पूर्णविराम

Shiv Sena's demand for Sangli seat has nothing to do with NCP, Jayant Patil said clearly | सांगली लोकसभेच्या जागेची मागणी शिवसेनेची, राष्ट्रवादीचा संबंध नाही; जयंत पाटीलांनी दिलं स्पष्टीकरण

सांगली लोकसभेच्या जागेची मागणी शिवसेनेची, राष्ट्रवादीचा संबंध नाही; जयंत पाटीलांनी दिलं स्पष्टीकरण

इस्लामपूर : कोल्हापूरमधून शाहू छत्रपती यांनी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमधून लढावे, असा विचार होता. शाहू छत्रपतींची उमेदवारी काँग्रेसकडून पुढे येईल, असे दिसते. त्यामुळे शिवसेनेने हातकणंगले आणि सांगलीचा आग्रह धरला आहे. त्यावर अद्याप चर्चा सुरू आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत राष्ट्रवादीचा आणि व्यक्तिश: माझा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण आमदार जयंत पाटील यांनी दिले.

इस्लामपूर येथे जिल्हा बँकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक दिलीपराव पाटील, अॅड. चिमण डांगे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, सांगलीच्या जागेवर काँग्रेस आग्रही होती आणि आजही आहे. मात्र, राज्यातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. कोणत्याही जागेचा अंतिम निर्णय झालेला नाही. मागील वेळी सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेली होती. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वाभिमानीकडून निवडणूक लढवली. त्याच मुद्द्यावर सेनेकडून बोट ठेवले जात आहे. मात्र, त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.

ते म्हणाले, सांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन जागा लढवावी, असा विचार होता. त्यानंतर काँग्रेसचा आग्रह वाढलेला दिसतो. सांगलीच्या जागेची मागणी करण्याची शिवसेनेची भूमिका आहे. त्याच्याशी आमचा संबंध नाही.

पाटील म्हणाले, भाजपकडून राज्यात घडलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरून सामान्य जनतेमध्ये राग आहे. त्यातून महाविकास आघाडीला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हातकणंगलेतून राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंचा पाठिंबा घ्यायची भूमिका घेतली होती. मात्र, आता त्यामध्ये बदल झाल्याचे दिसते. हातकणंगलेमध्येही शिवसेनेचा उमेदवार उभा राहू शकतो.

मुलाच्या उमेदवारीला पूर्णविराम

पत्रकार बैठकीत युवा नेते प्रतीक पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत विचारणा केली असता जयंत पाटील यांनी अशी कोणतीही शक्यता नसल्याचे सांगत प्रतीक यांच्या उमेदवारीच्या विषयाला आणि त्यावरून वेळोवेळी उठणाऱ्या अफवांना पूर्णविराम दिला.

Web Title: Shiv Sena's demand for Sangli seat has nothing to do with NCP, Jayant Patil said clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.