सांगली : बंगळुरु येथील शिवपुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांची भेट घेऊन केली. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे सम्राट आहेत, असे मत यावेळी गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी व्यक्त केले.संघटनेचे संस्थापक नितीन चौगुले यांनी बेळगाव येथे विधानभवनात बोम्मई व ज्ञानेंद्र यांची भेट घेतली. यावेळी चौगुले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे मार्गदर्शक, प्रेरणास्रोत, ऊर्जास्त्रोत असून संपूर्ण देशवासीयांचे आराध्य दैवत आहेत. अशा युगपुरुषाच्या मूर्तीची विटंबना आपल्या राज्यामध्ये होते, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.काही विकृत लोकांनी विटंबना केली असून त्यांना वेळीच अद्दल घडविणे आवश्यक आहे. रणधीरा पडे या संघटनेवर कायमची बंदी घालून या संघटनेला आर्थिक रसद पुरवणाऱ्या घटकांची चौकशी करावी. तसेच या घटनेमागील मास्टर माइंडचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.ज्ञानेंद्र म्हणाले की, शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचेच आहेत. ते संपूर्ण देशाचे राष्ट्रपुरुष आहेत. शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या चौकटीत बसविता कामा नये. ते संपूर्ण देशाचे चक्रवर्ती सम्राट आहेत. केळदी गावामध्ये राणी चन्नमांनी शिवाजी महाराजांच्या सुपुत्रांना कर्तव्यभावनेने संरक्षण दिले होते. त्यामुळे हा इतिहासच सांगतो की शिवाजी महाराजांबद्दल सर्वांनाच प्रेम आहे.बंगळुरु येथील प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत ७ जणांना अटक केली आहे. अजून ६-७ जणांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.यावेळी जमखंडीचे आमदार आनंदा न्यामगौडा, सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य तम्मनगौडा रवी-पाटील, शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य विशाल गायकवाड, श्रीधर घसारी, सचिन मोहिते, प्रशांत गायकवाड, पै. मोहन शिंदे, भूषण गुरव उपस्थित होते.
'शिवाजी महाराज देशाचे सम्राट', कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं मत; शिवपुतळा विटंबनाप्रकरणी दिले कारवाईचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 7:41 PM