पी. एन. मोहरेकर: मांगले ,येत्या विधानसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघातून माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी भाजपमधून निवडणूक लढवावी, यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून हालचाली सुरू आहेत. याबाबत नाईक यांनीही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून चाचपणी केली आहे. तब्बल १५ वर्षांनी वर्तुळ पूर्ण करीत ते शिवसेना-भाजप महायुतीत सहभागी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.शिराळ्यात १९९५ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक जिंकून युती शासनामध्ये सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्रीपद भूषविणारे शिवाजीराव नाईक १९९९ मध्ये राष्ट्रवादीमधून व २००४ मध्ये अपक्ष म्हणून विजयी झाले. मात्र २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवूनही त्यांना अपक्ष मानसिंगराव नाईक यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही काँग्रेसमध्ये जाऊनही अंतर्गत कुरघोड्यांना कंटाळलेल्या नाईकांनी वर्षभरापूर्वीच अपक्ष लढण्याची भूमिका घेऊन कामाला सुरुवात केली आहे. राजू शेट्टींना २००९ च्या लोकसभा निवडणुकीत आतून पाठिंंबा देणाऱ्या नाईकांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत शेट्टींचा उघड प्रचार करून मताधिक्यही दिले. त्यामुळे खासदार शेट्टींनीही त्यांच्या मागे राहण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यातील अनेकजण युतीच्या वाटेवर आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे युती शासनातील मंत्री म्हणून शिवाजीराव नाईकांना राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. याबाबत काही नेत्यांशी चर्चाही झाल्याचे समजते. याबाबत नाईकांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. यावेळी शिवसेना प्रवेशाबाबतही सविस्तर चर्चा झाली. मात्र सध्या केंद्रात भाजपचे सरकार असून, राज्यात युतीचे सरकार असल्यास तालुक्यात १९९५ सारखा विकास होईल, वाकुर्डे बुद्रुक पाणी उपसा जलसिंंचन योजनेलाही गती मिळून ती पूर्णत्वाकडे जाण्यासाठी मदत होईल, असा सूर कार्यकर्त्यांच्या बैठकीत निघाला.कशाचीही तमा न बाळगता गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत नाईक यांनी खा. शेट्टी यांना केलेली मदत कामी येणार असल्याची चर्चाही कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाली आहे.चौकट: भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व शिवाजीराव नाईक यांनी १९९५ च्या भाजप-शिवसेना युतीच्या शासनात अनुक्रमे बांधकाम विभागाचे कॅबिनेटमंत्री व राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. तसेच तत्कालीन पाटबंधारेमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याशी असलेले संबंध पाहता, भाजप प्रवेशासाठी अनुकूल परिस्थिती आहे.याचा अंदाज घेण्यासाठी नाईक दिल्लीला रवाना झाले असल्याचे समजते.
शिवाजीराव नाईकांचे राजकीय वर्तुळ पूर्ण!
By admin | Published: July 10, 2014 12:40 AM