शिवाजी देसाई
ढालगाव : सध्या शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाच्यावतीने लोककलेचे संकलन आणि संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लोककलेत जागर, गोंधळ, तमाशा, लावणी, शाहिरी, भेदिक, गजनृत्याच्या ओव्या, जात्यावरची ओवी आदीचे संकलन आणि संवर्धन करण्याचे काम केले जाणार आहे.
महाराष्ट्र ही संतांची, वीरांची आणि लोककलावंतांची भूमी म्हणूनच नावारुपाला आलेली आहे. या पारंपरिक लोककलांनी मनोरंजनासोबत प्रबोधनही केले आहे. परंतु या जिवंत लोककलेचे संकलन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याने, शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रथमच आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील गजनृत्य, ओव्या संकलित केल्या. यासाठी प्रा. तेजस चव्हाण, प्रा आप्पासाहेब बुडके, प्रा. डॉ. आबासाहेब शिंदे, प्रा. लोमेश कोळेकर, जगन्नाथ कोळेकर, दाजी कोळेकर व बिरोबा देवस्थान कमिटीचे सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.
महाराष्ट्राची पारंपरिक लोककला जागर, गोंधळ, तमाशा, लावणी, भेदिक, शाहिरी, गजनृत्य, ओव्या आदी लोककलेचे संकलन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्'ातील पारंपरिक लोककलांचे जितके संकलन करता येईल, तितके मोठ्या प्रमाणात संकलन केले जाणार असल्याचे प्रा. डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले.