सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्यास शासनाने बुधवारी तत्त्वत: मान्यता दिली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तशा सूचना दिल्या असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.
बुधवारी मुंबईत सामंत यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीला आमदार सुमनताई पाटील, उच्चशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, ॲड. धैर्यशील पाटील, रोहित पाटील व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत उपकेंद्राबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सामंत म्हणाले की, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू व्हावे, यासाठी पाठपुरावा केला होता. अनेक दिवसांपासूनचे त्यांचे हे स्वप्न होते. या उपकेंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. उपकेंद्र तातडीने सुरू करण्यासाठी शासनस्तरावर सर्व सहकार्य करण्यात येईल. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना उच्चशिक्षण विभागास दिल्या आहेत.
खासदार संजयकाका पाटील यांनीही याबाबत भाजप सरकार सत्तेत असताना तत्कालीन मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. जिल्हा शहर सुधार समितीने हे केंद्र सांगलीत व्हावे यासाठी आंदोलने केली होती. आता हा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत मिळत आहे. यापूर्वी खानापूर तालुक्यात हे उपकेंद्र उभारण्यास तत्त्वत: मान्यता मिळाली होती; मात्र जिल्ह्याच्या ठिकाणापासून खानापूर दूर असल्याच्या कारणावरून सांगली व परिसरातील संघटनांनी त्यास विरोध केला होता. दुसरीकडे खानापुरातच हे उपकेंद्र व्हावे म्हणून खानापूर तालुक्यातील संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर हे उपकेंद्र तासगावमध्ये करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे.
चौकट
बस्तवडे येथील जागेची शिफारस
तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील जागेची शिफारस आमदार सुमनताई पाटील यांनी केली होती. विद्यापीठाच्या समितीने त्या जागेची पाहणीही केली होती. याच जागेत उपकेंद्र उभारण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.
कोट
शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने या उपकेंद्राबाबतच्या कार्यवाहीसाठी उपसमिती स्थापन केली आहे. ही समिती सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील जागेची पाहणी करणार आहे. पाहणी केल्यानंतर ही समिती व्यवस्थापन परिषदेला अहवाल सादर करणार आहे. या अहवालानंतर विद्यापीठ अधिकार मंडळांकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ