शिराळा : माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी ४० वर्षांच्या राजकीय वाटचालीमध्ये सामान्य माणसांच्या हिताचा विचार करत लोकांची कामे मार्गी लावली आहेत. आम्ही वेगळ्या पक्षांत असलो तरी ते आम्हाला कायम मार्गदर्शक म्हणून राहिले असल्याने आम्ही ऋणानुबंध कायम जपले आहेत, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी केले.
शिराळा येथील माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या निवासस्थानी राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सदिच्छा भेट दिली. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, सुखदेव पाटील, सत्यजित नाईक, रणजितसिंह नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री देसाई म्हणाले, शिवाजीराव नाईक यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून अकरा वर्षे केलेले काम आजही संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत आहे. प्रशासनावर असणारा त्यांचा वचक व उत्तम वक्तृत्व या जोरावर त्यांनी मतदारसंघांमध्ये मोठी विकासकामे केली आहेत. त्या काळापासून आमचे असणारे ऋणानुबंध जपले असून यापुढील काळातही ते कायम राहतील.
यावेळी भटवाडी सरपंच विजय महाडिक, हर्षवर्धन नाईक, दादा सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
फोटो-२१शिराळा०२
फोटो ओळ-- शिराळा येथे राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक व रणधीर नाईक यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सुखदेव पाटील, रणजितसिंह नाईक, सत्यजित नाईक आदी उपस्थित होते.