कामेरी : संकटातून चालणाऱ्या महाराष्ट्राचे भवितव्य ठरविणारी ही विधानसभा निवडणूक आहे. सध्या महाराष्ट्रावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. यातील मुद्दल व व्याज भागविल्यास राज्याच्या विकासासाठी पैसे कोठून आणायचे? हा मोठा प्रश्न सत्तेवर आल्यानंतर प्राधान्याने सोडवावा लागणार आहे. आघाडी शासनाने देशात पहिल्या क्रमांकावर असणारे राज्य सहाव्या क्रमांकावर आणून सोडले आहे. हीच जाणता राजाची कर्तबगारी समजायची का? असा सवाल भाजपचे केंद्रीय रस्ते व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला. याचवेळी त्यांनी शिवाजीराव नाईक यांना निवडून द्या, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याची जबाबदारी माझी, अशी ग्वाहीही दिली.कामेरी (ता. वाळवा) येथे शिराळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, जाणता राजा कृषिमंत्री असतानाच्या काळात महाराष्ट्राच्या शेतीचा विकास दर तीन टक्क्यापेक्षा खाली आला. त्यामुळे राज्याचा अव्वल नंबर सहाव्या नंबरपर्यंत घसरला. शेतकरी पेट्रोल, डिझेल, गॅस तयार करतील तरच, ग्रामीण भागात लाखो रोजगार उपलब्ध होतील. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य केंद्र शासनामार्फत केले जाईल. शिवाजी महाराज कोणाची दौलत नाही, ते एक जाणता व धर्मनिरपेक्ष राजे म्हणून संपूर्ण देशापुढील आदर्श आहेत. राज्य कसे चालवावे, याचा आदर्श त्यांच्याकडूनच घेऊन महाराष्ट्रात शिवशाहीचे राज्य आणू. भाजपला मुस्लिमविरोधी असल्याचे भासवणाऱ्यांनी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आम्हीच राष्ट्रपती पदावर बसवले, हे लक्षात घ्यावे.शिवाजीराव नाईक म्हणाले की, ७८ हजार एकराला पाणी देणारी वाकुर्डे बुद्रुक योजना, चांदोली धरणाखालील मोकळ्या क्षेत्रामध्ये पैठणच्या धरतीवर मोठा बगीचा उभारून पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणे, मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारणे, देश-विदेशात जिवंत नागाच्या पूजेसाठी प्रसिध्द असणारी शिराळ्याची नागपंचमी पूर्ववत सुरू व्हावी यासाठी गडकरी यांनी सहकार्य करावे.खा. राजू शेट्टी, खा. संजय पाटील, नानासाहेब महाडिक, सदाभाऊ खोत, पृथ्वीराज देशमुख, दि. बा. पाटील, रणधीर नाईक, सुखदेव पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांची भाषणे झाली. यावेळी विक्रम पाटील, प्रताप पाटील, सचिन जाधव, सी. एच. पाटील, शहाजी पाटील, बंडाकाका पाटील, संताजी पाटील, पोपट पाटील, भगतसिंग शिंदे उपस्थित होते. शिक्षक नेते सदाशिव पाटील यांनी प्रास्ताविक केले. महेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
शिवाजीरावांना कॅबिनेट मंत्री करतो!
By admin | Published: October 06, 2014 10:18 PM