शिराळा : निमित्त होते.. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याचे! मात्र यावेळी माजी राज्यमंत्री नाईक, खासदार धैर्यशील माने आणि युवा नेते रणधीर नाईक यांच्यात बंद खोलीत अर्धा तास चर्चा झाली.दि. २ मार्च रोजी शिवाजीराव नाईक यांचा ८० वा वाढदिवस होता. दि. १ रोजी खासदार धैर्यशील माने हे रेठरेधरण येथील एका बैलगाडी शर्यत स्पर्धेच्या बक्षीस वितरणाकरिता आले होते. शिवाजीराव नाईक यांचा वाढदिवस दि. २ रोजी असल्याचे समजले आणि त्यांनी तत्काळ आपला ताफा नाईक यांच्या शिराळा येथील निवासस्थानाकडे वळवला. याचवेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक हे देखील शिवाजीराव नाईक यांना शुभेच्छा देण्याकरिता आले होते.खासदार माने यांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. माने म्हणाले, माजी राज्यमंत्री नाईक यांनी नेहमीच समाजाभिमुख कार्य केले आहे. खासदार माने आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी एकत्रितपणे शुभेच्छा दिल्या हा क्षण उपस्थितांकरिता भुवया उंचावणारा होता. शिवाजीराव नाईक यांना शुभेच्छा दिल्यानंतर लगेचच मानसिंगराव नाईक हे काम असल्याने बाहेर पडले. यावेळी युवा नेते पृथ्वीसिंह नाईक, सागर मलगुंडे, भगवान मस्के, विनायक गायकवाड, नीलेश आवटे, प्रशांत पाटील उपस्थित होते. दरम्यान माजी राज्यमंत्री नाईक, धैर्यशील माने व रणधीर नाईक यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली.
Sangli Politics: शिवाजीराव नाईक, धैर्यशील माने यांची बंद खोलीत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 17:05 IST