लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भाजपमध्ये नव्याने आलेल्यांनी कर्तृत्वाच्या बळावर आपल्या आधी पक्षात आलेल्यांना मोडीत काढले आहे. वाळवा - शिराळ्यातील शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, निशिकांत पाटील बेदखल झाले असून, भाजपमधील दुफळी चव्हाट्यावर आली आहे. रविवारी संपलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेमधून हे पुन्हा अधोरेखित झाले.
सांगली - कोल्हापूरच्या दोन - चार तालुक्यांत रयत क्रांती संघटनेचे अस्तित्व दाखवण्यासाठी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या साथीने किसान आत्मनिर्भर यात्रेचे नियोजन केले. मात्र, त्यांचा वकूब माहीत झाल्याने वरिष्ठांनी पेठनाक्यावरील महाडिक बंधूंकडे संयोजन दिले. या परिसरात राहुल आणि सम्राट महाडिकांच्या ‘पॉवर’चा वचक आहे. या दोघा बंधूंनी धडाकेबाज संयोजन करून जबाबदारी पेलली. पण त्याचवेळी भाजपमधील दुही विस्तारत गेली.
महाडिक बंधूंनी दहा - अकरा महिन्यांपूर्वी अधिकृतपणे भाजपप्रवेश केला. लगेच राहुल यांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले, तर सम्राट यांना भाजपच्या राज्य कार्यकारिणीवर घेण्यात आले. ज्या पक्षात असतील, तिथे एकनिष्ठेने राबणाऱ्या महाडिक बंधूंनी वाळवा - शिराळा तालुक्यांत स्वत:चा मजबूत गट तयार केला आहे. सम्राट यांनी विधानसभेला शिराळा मतदारसंघात पंचेचाळीस हजारांवर मते घेऊन ताकद दाखवून दिली, तर राहुल यांनी जयंत पाटील यांच्यासारख्या तगड्या नेत्याच्या विरोधात मोट बांधली आहे.
महाडिक बंधूंची हीच मर्दुमकी त्यांच्याआधी भाजपमध्ये गेलेल्यांना खुपू लागली. त्यातून दुही निर्माण झाली. इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळे भाजप आणि मित्रपक्षांचे सगळेच नेते विरोधात आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यक्रम, आंदोलनांमध्ये दुफळी दिसते. दोन्ही गट स्वतंत्रपणे सोपस्कार पार पाडतात. सध्या पाटील यांना भाजपच्या कार्यक्रमांत विचारातच घेतले जात नाही. तीच अवस्था शिराळ्याची. तेथेही माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांचा गट एकीकडे, तर महाडिक गट दुसरीकडे असे चित्र नेहमीचेच. पक्षात पाटील, नाईक, देशमुख जणू बेदखल झाले आहेत.
किसान आत्मनिर्भर यात्रेत हे तिघे नेते कोठेच दिसले नाहीत. नाही म्हणायला निशिकांत पाटील केवळ सांगता सभेवेळी मंचावर बसलेले दिसले. शिवाजीराव नाईक तर सभेआधी इस्लामपुरात निशिकांत पाटील यांच्या रुग्णालयाच्या कार्यक्रमास उपस्थित होते, पण सभेत नव्हते. मंचासह दोन्ही मतदारसंघात लागलेल्या डिजिटल फलकांवरूनही तिघे गायब होते. फारच अडगळीत पडल्याने यानिमित्ताने आलेल्या नेत्यांचे फोटो छापण्यापुरते सत्कार तेवढे त्यांनी स्वतंत्रपणे केले!
महाडिक बंधूंचे दणक्यात ‘लाॅंचिंग’
आत्मनिर्भर यात्रेची सारी सूत्रे राहुल आणि सम्राट महाडिक यांच्याकडेच असल्याचा माहौल होता. परिसरात त्यांच्या डिजिटल फलकांची रेलचेल होती. दोघाही बंधूंचे दणक्यात ‘लाॅंचिंग’ झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही याला जणू संमती होती. त्यामुळे उद्या राहुल आणि सम्राट यांची नावे अनुक्रमे इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झाली तर आश्चर्य वाटायला नको...
तिघे बेदखल होण्याची कारणे काय?
शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख आणि निशिकांत पाटील यांना पक्षनेतृत्वाने आत्मनिर्भर यात्रेत सहभागी होण्यास सांगितले नव्हते. तिघांनी पक्षवाढीसाठी अपेक्षित योगदान दिलेले नाही. त्यातच नाईक यांच्या सहकारी संस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत, तर देशमुखांची राजकीय ताकद फारशी राहिलेली नाही. पाटील यांचा भपकेबाजपणा आणि बाकीच्या नेत्यांशी फटकून राहणे इतरांना रुचलेले नाही. परिणामी तिघेही एकाकी पडल्याचे बोलले जाते.