कोकरूड : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात बेरजेचे राजकारण सुरू केले असून, पारंपरिक राजकीय विरोधक असलेल्या माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या अडचणीतील संस्थांना वित्तीय मदत करण्याबरोबरच राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव दिला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची वेळ मिळाल्यास या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
जयंत पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वी काही माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे सूतोवाच केल्यानंतर शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या निर्णयाकडे नजरा लागल्या होत्या. भाजपने विधानसभेवेळी शिराळ्यात महाडीक गटाकडून झालेली बंडखोरी थोपविली नाही. उलट त्यांनाच पक्षात घेतले. भाजपने अनेक नेत्यांच्या संस्थांना मदत केली.मात्र, शिवाजीराव नाईक गटाला डावलले. मंत्रिपदही दिले नाही. उलट अडचणी निर्माण केल्या, अशी भावना झाल्याने नाईक यांच्या कार्यकर्त्यांत नाराजी होती. याचा फायदा घेत जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी त्यांच्या संस्थांना कर्जपुरवठा करण्याचा शब्द दिला आहे. त्या बदल्यात राष्ट्रवादीने त्यांना पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव दिला आहे.
कार्यकर्ते म्हणतात, आम्ही तुमच्यासोबत!
सध्या शिवाजीराव नाईक कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. भाजपने मंत्रिपदाबाबत फसवणूक केली. आता अडचणीत आलेल्या संस्थांना राष्ट्रवादीकडून मदत मिळून त्या सुरू होणार असतील तर ही सकारात्मक बाब आहे. नाईक हेच आमचा पक्ष असल्याने ते जिकडे जातील, तिकडे आम्ही सोबत येणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे नाईक यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित असल्याचे मानले जात आहे.