सांगली : हजारो वर्षे पुरणारी अणुऊर्जा आपल्याकडे उपलब्ध आहे. वाढत्या लोकसंख्येला तिची प्रचंड आवश्यकता आहे. त्यामुळे अणुप्रकल्पांंविषयीचे गैरसमज सोडून अणुसंशोधन व्हायला हवे. त्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत, असे मत अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांनी व्यक्त केले.प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील जयंतीनिमित्त सोशल फोरमच्यावतीने कर्मयोगी पुरस्काराने भोजे यांना सन्मानित करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. एक लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, घोेंगडी आणि पगडी देऊन भोजे यांचा सन्मान केला.डॉ. भोजे यांनी यावेळी भारतातील अणुसंशोधन व सयंत्राचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, सौरऊर्जेचा वापर वाढला तरी, अणुऊर्जेला पर्याय नाही. अमेरिकेने तिचा वापर विध्वंसासाठी केला. त्यानंतर रशियाने अणुसयंंत्र तयार केले.
भारतात जैतापूरमध्ये प्रकल्पाला विरोध झाला. २१ देशांत ४३८ अणुसयंत्रे आहेत. जपानमध्ये त्सुनामीमुळे अणुभट्टीचे नुकसान झाले, पण स्फोटात एकही माणूस दगावला नाही. विध्वंस होण्याच्या गैरसमजातून विरोध होत आहे.डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, वैज्ञानिक दृष्टीचा वापर करणार नसाल, तर आजचा पुरस्कार अनाठायी ठरेल. त्यासाठी विज्ञानवादी होण्याची गरज आहे. संचालक गौतम पाटील यांनी स्वागत केले. माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, डॉ. भोजे यांनी अणुऊर्जा लोकहितासाठी वापरली. हा विज्ञानवादी विचार शांतिनिकेतनने कायम जपला आहे.यावेळी उमा भोजे व डॉ. भोजे यांच्या मातोश्री कोंडुबाई यांचाही सत्कार केला. तानाजीराव मोरे यांनी आभार मानले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्टे, शिवाजीराव पवार, माधवराव माने, सनतकुमार आरवाडे, वैभव नायकवडी, बी. आर. थोरात, डॉ. बाबूराव गुरव, धनाजी गुरव, गौतमीपुत्र कांबळे, डॉ. सपना भाटे, ब्रिगेडीयर सुरेश पाटील, श्रीनिवास डोईजड, डॉ. कुबेर मगदूम, एम. के. अंबोळे उपस्थित होते.