शिरटे : छत्रपती शिवाजी महाराजांची धोरणे शेतकऱ्यांच्या हिताची होती. त्यामुळेच एकाही शेतकऱ्याने शिवशाहीत आत्महत्या केली नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या वाटेत फुले टाकली; पण कधी खिळे ठोकले नाहीत. आज देशाला छत्रपतींच्या कृषी धोरणांची गरज असून, श्रमकरी व कष्टकऱ्यांच्या घामाला किंमत मिळाली पाहिजे हेच शिवचरित्रातून शिकावे लागेल, असे मत इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.
भवानीनगर (ता. वाळवा) येथे जागृती साहित्य संस्कार मंडळाच्यावतीने आयोजित कवयित्री शैला सायनाकर स्मृती व्याख्यानमालेत ‘शिवचरित्रातून आज काय शिकावे’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमोल चव्हाण, सुशांत पाटील उपस्थित होते.
डॉ. कोकाटे म्हणाले, पती निधनानंतर सती जाण्याची प्रथा नाकारणाऱ्या राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना घडवले. त्याच छत्रपतींनी ३५० वर्षांपूर्वी स्वतःच्या सुनेला युद्ध आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण देऊन खऱ्या अर्थाने महिलांना स्वातंत्र्य दिले होते. मानव ही एकच जात असल्याचे छत्रपतींनी आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवले होते. प्रास्तविक स्वाती मोहिते यांनी केले. अध्यक्ष सुहास सावंत, उपाध्यक्ष वनिता मोहिते, सचिव निवास पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी सूत्रसंचालन केले तर सुहास पवार यांनी आभार मानले.
चाैकट
कृषी कायद्याने नुकसानच
डॉ. कोकाटे म्हणाले, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता केंद्राने केलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून, शेतकऱ्याचे आर्थिक जीवन उद्ध्वस्त करणारा आहे. पंजाबमधील हुशार शेतकऱ्यांना हा कायदा समजला असल्यानेच त्यांनी आंंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. परंतु, त्यांच्या वाटेतही खिळे ठोकण्याचे काम सरकारने केले आहे.