अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ --कवठेमहांकाळ तालुक्यात शिवसेनेचे वारे सध्या जोरात वाहू लागले असून, सेनेने तालुकाध्यक्ष दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाखा उद्घाटनाचा धडाका लावला आहे. युवावर्गाचा कल सेनेकडे झुकू लागल्याने सेनेला बळ येऊ लागले असतानाच, इतर राजकीय पक्ष कोमात असताना, सेना मात्र तालुक्यात जोमात आहे.आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तालुक्यात राजकीय मरगळ निर्माण झाली आहे. तसेच लोकांच्या मनात स्वत:ची नेतृत्वाची जागा निर्माण करण्यासाठी राजकीय नेतृत्व कोणीच पुढे येत नाही. हे असे अस्वस्थ करणारे राजकीय चित्र असताना शिवसेनेच्या दिनकर पाटील यांनी मात्र काळाची पावले ओळखत शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी गाव तिथं शाखा आणि घर तिथं शिवसैनिक ही बाळासाहेब ठाकरेंची मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या या मोहिमेला तालुक्यात मोठा प्रतिसादही मिळू लागला आहे.गेल्या आठवड्यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यात खरशिंग, देशिंग, कवठेमहांकाळ शहरामध्ये सात शाखांचे उद्घाटन करण्यात आले, तर याआधी मे महिन्यामध्ये दिनकर पाटील यांनीही पाच शाखांचे उद्घाटन केले होते. यावरून हेच स्पष्ट होते की कवठेमहांकाळ तालुक्यात शिवसेना आता बाळसे धरू लागली आहे.मागील महिन्यात झालेल्या कवठेमहांकाळ विकास सोसायटीच्या निवडणुकीत सेनेचे दोन संचालक निवडून आले असून, आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सेनेने शहरासह तालुक्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. शहरासह तालुक्यातील युवकांना सेनेच्या भगव्याखाली एकत्र आणण्यासाठी तालुकाध्यक्ष दिनकर पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. गाववार बैठका, शहरातील प्रत्येक वॉर्डात संपर्क व तरुणांच्या बैठका घेण्याचा दिनकर पाटील यांनी सपाटाच लावला आहे.तालुक्यातील अनिल बाबर, संजय चव्हाण, मारुती पवार, धनंजय देसाई, दिलीप गिड्डे, प्रकाश चव्हाण, प्रशांत कारंडे, अर्जुन गेंड, संदीप शिंत्रे या पदाधिकाऱ्यांनी दिनकर पाटील यांच्या नेतृवाखाली सेनेला बळकटी आणण्यासाठी कंबर कसली आहे. तालुकाध्यक्ष स्वत: जबाबदारी घेऊन कामाला लागल्याने तालुक्यातील युवावर्ग पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकवटू लागला आहे. सेनेचे कार्यालय युवक कार्यकर्त्यांनी भरू लागले आहे. तालुक्यात भाजप, कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे राजकीय पक्ष शांत असताना दिनकर पाटील यांनी आगामी राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन सेनेच्या मावळ्यांची फौज तयार करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. तालुक्यातील जनता खमक्या राजकीय नेत्याच्या आधाराच्या शोधात असताना सेनेच्या दिनकर पाटील यांनी आपल्या नेतृत्वाची झलक दाखवत, तालुक्यातील युवावर्गाला, जनतेला लक्ष वेधण्यास भाग पाडले आहे, सध्या तरी इतर राजकीय पक्ष शांत असताना, दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मात्र जोमात आहे. याचा आगामी निवडणुकांमध्ये फायदा होणार का?पक्ष वाढीचे काम : तालुक्यात शब्दाला मानशिवसेना तालुक्यात जिवंत ठेवण्याचे व वाढवण्याचे काम दोन सख्खे भाऊ दिनकर पाटील, युवराज पाटील करत आहेत. युवराज पाटील हे हरोली गावचे सरपंचपद सांभाळत दिनकर पाटील यांना मोलाची साथ करीत आहेत. त्यांच्या शब्दाला तालुक्यात मान असल्याने युवराज पाटील यांनीही तालुक्यात मोठी फिल्डिंग लावली आहे
शिवसेना जोमात, बाकीचे पक्ष कोमात
By admin | Published: June 21, 2016 12:22 AM