सांगली : राज्यातील भाजप सरकारमधून शिवसेना बाहेर पडेल, असे वाटत नाही. शिवसेनेने अनेकदा सरकारमधून बाहेर पडण्याची वक्तव्ये केली आहेत. जेव्हा ते प्रत्यक्षात कृती करतील, तेव्हाच लोक त्यांच्यावर लोक विश्वास ठेवतील. त्यांची अवस्था ‘लांडगा आला रे आला’ मधील गोष्टीसारखी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली.
सांगलीत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आ. जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेच्या भूमिकेबाबत आ. पाटील म्हणाले की, भाजपविरोधाची शिवसेनेची भूमिका आतबाहेरची आहे. त्यांचा निर्णय पक्का झाला तरच लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील. राज्यात जशा घटना घडतील तशा शिवसेनेकडून प्रतिक्रिया येतात. पण सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका शिवसेना घेणार नाही. ते सत्तेत आहेत. शिवसेनेला विरोधही करावयाचा आहे, पण सरकारला पाठिंबा देताना लाजही वाटत आहे. त्यामुळेच अधूनमधून शिवसेनेच्या नेत्यांच्या भावना व्यक्त होत असतात.
प्रत्यक्षात कृती घडेल, तेव्हाच आता लोक शिवसेनेवर विश्वास ठेवतील. त्यांची अवस्था लांडगा आला रे आला या गोष्टीसारखी झाली आहे. त्यामुळे शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल, अशी अपेक्षा करून स्वप्न पाहण्यात काहीच अर्थ नाही.
ग्रामपंचायत व थेट सरपंच निवडणुकीबाबत पाटील म्हणाले की, गतवेळी जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या ताब्यात होत्या. यंदाही तीच परिस्थिती कायम राहिल. गेल्या तीन ते चार निवडणुकांत भाजपला लाटेमुळे यश मिळाले असले तरी ग्रामपंचायती निवडणुकीत चित्र बदललेले असेल.
आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून ग्रामपंचायती निवडणुकीत भाग घेत नाही. गावात अनेक गट असतात. त्यात वार्डावार्डात भावकीचे राजकारण होत असते. थेट सरपंच निवडीमुळे गावाच्या विकासात अडसर निर्माण होण्याची भीती आहे.
सरपंच एका पक्षाचा आणि सदस्य दुसºया पक्षाचे निवडून आले तर अडचण येऊ शकते. त्यासाठी सरपंचाना जादा अधिकार देण्याची गरज आहे. भविष्यात भाजपचे सर्वाधिक सरपंच निवडून आले तर त्यांना जादा अधिकार मिळतील. नाही आले तर सरपंचाचे अधिकार कमी होती. हे सरकार वातावरण बघून निर्णय घेत असते. त्यांना जनतेशी काहीही देणेघेणे नाही, असा टोलाही त्यांनी लगाविला.
थेट महापौर निवडीबाबतही असाच प्रकार होणार आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचेच उदाहरण घेतल्यास तीनही शहरात चालणारा एकही व्यक्ती नाही. त्यात दोन आमदारांची लोकसंख्येची मान्यता घेऊन महापौर होईल. पण त्याला अधिकारच नसतील, तर तो निवडून येऊन तरी काय करणार? असा सवाल करीत भाजप सरकारकडे निर्णय घेण्याची दूरदृष्टी नाही. सोशल मिडीया, दूरचित्रवाणीवर प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी निर्णय घेतले जात आहेत,असा टोलाही त्यांनी लगाविला. राणेंशी चांगले संबंध
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस सोडल्याबद्दल विचारता पाटील म्हणाले की, राणे यांनी काँग्रेस, शिवसेनेसह राष्ट्रवादीवर टीका करणार असल्याचे म्हटले आहे. ते जेव्हा राष्ट्रवादीवर बोलतील, तेव्हा बघू. अजून ते कुठल्याही पक्षात गेलेले नाहीत.
राणे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असला तरी एक आमदार मात्र घरात ठेवला आहे. त्यामुळे ते काँग्रेस व भाजपपैकी कुणाला मदत करीत आहेत, हे स्पष्ट होते. विरोधी पक्षनेतेपद मला मिळू शकते. त्यामुळेच त्यांना एका आमदारकीचा राजीनामा देऊ नका, असे उच्चस्तरावरून सांगण्यात आल्याचे समजते, अशी मिश्किल टीप्पणीही त्यांनी केली.