अर्जुन कर्पे : कवठेमहांकाळ ,तासगाव-कवठेमहांकाळमध्ये गृहमंत्री आर. आर. पाटील यांना शह देण्यासाठी शिवसेनेचे नेते आ. दिवाकर रावते यांनी मेळावा घेऊन ही जागा शिवसेना सोडणार नसल्याचे सांगितले खरे, मात्र त्यामुळे संभ्रमच अधिक निर्माण झाला. ही जागा भाजपला मिळणार की शिवसेनेला, याबाबत निश्चिती नसल्याने कार्यकर्ते द्विधावस्थेत आहेत. भाजपमधून लढण्यास इच्छुक असणाऱ्या माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्यावर शिवसेनेने साधलेला निशाणा कोणाला फायद्याचा ठरणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.कवठेमहांकाळ येथे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचा शिवबंधन मेळावा रावते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. परंतु हा मेळावा घेण्यामागे दडलेले राजकीय समीकरण रावते यांनी स्वत:च स्पष्ट केले. या मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवारीवरून कलह सुरू आहे. माजी राज्यमंत्री घोरपडे भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्या सहकार्याच्या जोरावर भाजपातील वरिष्ठ नेत्यांशी बोलणी करून उमेदवारी मिळविण्याचा विडाच उचलला आहे. मात्र गत निवडणुकीत आम्ही पाठिंबा देऊनही घोरपडे यांनी माघार घेतल्यामुळे शिवसेनेचे दिनकर पाटील यांनी गृहमंत्री पाटील यांच्याशी टक्कर दिली, अशी स्पष्टोक्ती करत रावते यांनी घोरपडेंच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. महायुतीची उमेदवारी कुणाला द्यायची, या मुद्यावरून महायुतीचे प्रमुख पक्ष भाजप व शिवसेना यांच्यात संघर्षाची ठिणगी पडल्याने कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. रावतेंनी भाजपला तासगाव-कवठेमहांकाळ पाहिजे असेल तर शिवसेनेसाठी मिरज व सांगली विधानसभा मतदारसंघ सोडावेत, अशी तडजोडीची भूमिका जाहीरपणे मांडली आहे. परंतु ही भूमिका भाजपला राजकीय समीकरणाच्यादृष्टीने न परवडणारी आहे. शिवसेना तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांना रावतेंनी मतदारसंघात नेटाने कामाला लागा, उमेदवारीचे मी बघतो, कोणत्याही परिस्थितीत तासगाव-कवठेमहांकाळ शिवसेनेलाच देऊ, असे सांगितल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे भाजपचे तिकीट मिळवून निवडणूक लढवायचीच, या घोरपडेंच्या मनसुब्याला हादरा बसला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत वारीवरून संघर्षाला सुरुवात झाली आहे. देशातील मोदी लाटेचा फायदा घेऊन विधानसभेचे रण जिंकण्याच्या इराद्याने निघालेल्या घोरपडेंना उमेदवारीसाठीच कडवा संघर्ष करावा लागत असल्याने त्यांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. अर्थात त्यामुळे गृहमंत्री पाटील गट मात्र सुखावू लागला आहे!
घोरपडेंवर शिवसेनेचा निशाणा!
By admin | Published: July 12, 2014 12:12 AM